जिल्हाप्रशासनाला निवेदन:अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन छेडू,पक्षाचा इशारा…
सिंधुदुर्गनगरी ता.१६: तिवरे धरण फुटून निष्पाप लोकांचे बळी घेतलेल्या दोषींवर कारवाई करण्यास राज्य सरकार निष्क्रियता दाखवत आहे.तसेच काही मंत्री बेताल वक्तव्य करून दोषींना सरंक्षण देत असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने केला आहे.दोषींवर तत्काळ कारवाई करावी यामागणीसह महामार्ग चौपदरीकरण,पीक कर्ज वाटप व इंधन दरवाढ कमी होण्याबातबत शासनाचे लक्ष वेधले आहे.यावर योग्य ती कार्यवाही करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा अन्यथा सर्व पक्षीय आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटलेल्या संदर्भात व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य महत्वाच्या मागण्यांकडे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर विकास सावंत व काका कुडाळकर पत्रकार परिषदेत बोलत होते.
मागील पाच वर्षां पासून शिवसेना-भाजपच्या काळात सातत्याने भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचे काम सुरू आहे. विरोधी पक्ष, आयटीआय कार्यकर्ते अनेकदा भ्रष्टाचार संदर्भात ठोस पुरावे समोर आणले आहेत. मात्र, सरकारने भ्रष्टाचाराला नेहमी क्लीन चीट देण्याची भूमिका घेतली आहे. त्याची किंमत निरपराध लोकांना आपले प्राण देवून चुकवावी लागत आहे. गेल्या आठवड्यात मालाड, मुंबई येथे भिंत कोसळून 27 जणांचे बळी गेले. सुमारे 21 कोटी रूपये खर्च करून दिड वर्षापूर्वी ही भिंत बांधण्यात आली होती. मात्र यात भ्रष्टाचार झाल्याने ही भिंत कोसळून नाहक बळी गेले. त्याचबरोबर तिवरे धरण फुटल्याने 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4 जण अजुनही बेपत्ता आहेत. हे धरण फुटण्यापुर्वीच डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर सुद्धा या धरणातून पाणी गळत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी धरण फुटून कित्येक संसार उध्वस्त झाले. या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर शासन कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे.
राज्यात खरिपाचा हंगामा सुरू आहे. जिल्हा बँक सोडून उर्वरित राष्ट्रीय बॅकांनी पुरेशा प्रमाणात पीक कर्ज वाटप केलेल्या नसल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून येत आहेत. या पार्श्वभूमीवर बॅकांनी शेतख-यांना सुलभ पद्धतीने पीक कर्ज वितरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थ संकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रतिलिटर 2.50 रूपयांची वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांवर अन्याय होणार आहे. गणेश चतुर्थी सण जवळ येत असून त्याअनुषंगाने महामार्ग चौपदरीकरणाचे काम टापटीप होणे गरजेचे आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम समाधानकारक नाही. त्यामुळे दिलीप बिल्डकाॅन कंपनी ठेकेदाराला आवश्यक त्या सुचना देवून महामार्ग चौपदरीकरणाचे काम चतुर्थी पूर्वी सुरळीत करावे अशी मागणी केली आहे.
जिल्हाध्यक्ष विकास सावंत, प्रांतीक सदस्य तथा प्रवक्ते काका कुडाळकर, माजी सभापती बाळा गावडे, महिला काँग्रेस राज्य सदस्य विभावरी सुकी, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सिद्धेश परब, संतोष तावडे, अल्पसंख्याक अध्यक्ष सर्फराज नाईक, उल्हास मणचेकर, सुधीर मल्लार, विनायक वर्णेकर, मोसील मुल्ला, विजय प्रभू अन्य पदाधिकारी उपस्थित होते.