भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांची बंदर विकास राज्यमंत्र्यांकडे मागणी…
मालवण, ता. १६ : जिल्ह्यातील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याच्या कामाची चौकशी करुन त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील प्रवासी होडी वाहतुक तसेच जलक्रीडा, वाळू वाहतुक करणाऱ्या होड्या परवाने यांचा परवाने व इतर तांत्रिक गोष्टींचा कायदेशिर बडगा दाखवून आर्थिक तडजोड करुन सर्वसामान्य व्यावसायीकांना त्रास देणे व आर्थिक माया गोळा करणे हा एक कलमी कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात २६ मे २०१९ पासून जल वाहतुकीस बंदी असताना २६ मे ते २ जून २०१९ पर्यंत तालुक्यात आर्थिक तडजोड करुन खुलेआम जलक्रीडा व प्रवासी वाहतुक सुरू होती. कोणतेही शासकीय आदेश नसताना अनधिकृत धंदे करण्यास कायम प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक हे प्रोत्साहन देऊन आर्थिक तडजोड करत आहेत.
तालुक्यातील कालावल, कर्ली खाडीमध्ये वाळु काढण्यास होड्याना परवानगी बंदर खात्याने दिली होती. दिलेल्या परवान्या व्यतिरिक्त अनधिकृत होड्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांच्या आर्थिक कृपादृष्टीने चालत होत्या.
सावंतवाडी येथे नगरपरिषदेच्या मालकीचा तळ्यात कायद्याचा धाक दाखवून जलक्रीडा बंद करण्यास भाग पाडून आर्थिक मागणी पूर्ण करा आणि व्यवसाय सुरु करा असे सांगण्यात आले. हे सर्व विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाले आहे. मालवण बंदर जेटीवरील अनधिकृत स्टॉलबाबत तक्रार करुनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
आता सद्यस्थितीमध्ये होड्याचा परवानगीचे होडीचा सर्वेक्षणाचे काम बंदर खात्यामार्फत सुरु आहे. परवान्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आम्ही सांगू त्याच संस्थेमार्फत केले पाहिजे. एवढीच प्रशिक्षणाची रक्कम दिली पाहिजे असा दबाव आणून परवाना देताना नाहक त्रास दिला जात आहे.
मालवण बंदरामध्ये जलक्रीडेसाठी दिशादर्शक पिंपे करोडो रुपये खर्च करुन लावले होते. तांत्रिक बाबीचा विचार न करता ती लावल्याने आठ दिवसात वाहून गेल्या. यावर काय कारवाही झाली. कोणतीही कार्यवाही न करता शासनाचा लाखो निधी अधिकाऱ्याचा नाकर्तेपणामुळे वाया जात आहे. हे सर्व पालकमंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांचा निदर्शनास आणून देऊनही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. संबंधीत अधिकारी तुमचात दम असेल तर माझी चौकशी करा, बदली करा असे शासकीय बैठकीत खुलेआम सांगत आहे.
संबंधीत बंदर खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. संबंधीत अधिकारी वरिष्ठांना आर्थिक पुरवठा करावा लागतो असे सांगून आर्थिक व्यवहार करत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी मुख्यमंत्री व आपण स्वत: दिवस-रात्र काम करत असताना कॅप्टन सुरज नाईक सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे सरकारची व आपली बदनामी होत आहे. तरी यांची सखोल चौकशी करुन तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणीही श्री. केनवडेकर यांनी केली आहे.