परशुराम उपरकर यांचे पालकमंत्र्यांना आव्हान
कणकवली, ता.१६ : हायवे ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला तर पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आम्ही जाहीर अभिनंदन करू असे आव्हान मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज दिले. त्यांनी येथील मनसेचे संपर्क कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांचा हायवे पहाणी दौरा ही एक प्रकारची स्टंटबाजी असल्याची टीका देखील केली.
श्री उपरकर म्हणाले पालकमंत्री श्री केसरकर यांनी यापूर्वी देखील हायवेवर बळी गेला तर ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असे जाहीर केले होते. त्यानंतर गेल्याच आठवड्यात तेर्सेबांबर्डे येथे एका ट्रक चालकाचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून दाखवावा. मुंबई-गोवा महामार्गावरील समस्या दूर होण्यासाठी मनसे तसेच इतर पक्षांकडून आंदोलने करण्यात आली, कणकवलीकर नागरिक देखील पक्ष बाजूला ठेवून रस्त्यावर उतरले. पण त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली नाही. आता खड्डे बुजविण्याचे श्रेय विरोधकांकडे जाते असे लक्षात आल्यावर त्यांनी हायवे पाहणी दौरा केला. मात्र या दौर्यातून फारसे काही निष्पन्न होणार नाही. हायवे खड्डेमुक्त असेल पावसाळी पाणी निचरा होण्याची योग्य व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील मागील वर्षीच्या हायवे पाहणी दौर्यात दिली होती. पण हायवे ठेकेदाराने बांधकाम मंत्र्यांचे आदेश देखील धुडकावून लावले होते. त्यामुळे हायवे ठेकेदार पालक मंत्र्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवणार आहे. महामार्गावरील खड्डे बुजविणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. तसा करार देखील ठेकेदाराने शासनाबरोबर केलेला आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे श्रेय घेण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नाही असेही उपरकर म्हणाले.