सभापतींना एसटी बसफेरी बंद करण्याचा अधिकार कोणी दिला?…

260
2
Google search engine
Google search engine
Google search engine

खैदा- कातवडमधील महिला ग्रामस्थ संतप्त ; आमदार वैभव नाईक यांचेही वेधले लक्ष…

मालवण, ता. १७ : आमची मुले शाळेत जात नाही का? आम्ही तालुक्यात राहत नाही का? जर आम्ही या तालुक्यात राहतो मग आमच्या मार्गावरील एसटी बसफेरी बंद करण्याचा अधिकार सभापतींना दिला कोणी? असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करत कातवड येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. जर आमच्या मार्गावरील एसटी बसफेरी बंद केल्यास सभापती सोनाली कोदे यांच्या दालनात जाऊन जाब विचारू असा इशारा संतप्त महिलांनी दिला.
कोळंब पुलावरून एसटी वाहतूक सुरू झाल्यानंतर मालवण कुडोपी बसफेरी कोळंब पुलावरून सोडण्यात आली. याबाबत खैदा- कातवड ग्रामस्थांनी शालेय विद्यार्थ्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी सायंकाळची मालवण कुडोपी एसटी बसफेरी खैदा- कातवड गावातून सोडावी अशी मागणी आगारव्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्याकडे केली. मात्र खैदा- कातवड मार्गावरून सोडली जाणारी बसफेरी बंद करून ती कोळंब पुलावरून सोडली जावी अशी मागणी पंचायत समिती सभापती सोनाली कोदे यांनी आगारव्यवस्थापकांकडे केली. यावरून आक्रमक बनलेल्या कातवड येथील उन्नती ग्रामसंघ कोळंबच्या महिला ग्रामस्थांनी आज आगारात धडक देत आगारव्यवस्थापक बोधे यांना जाब विचारला.
यावेळी कोळंब उन्नती ग्रामसंघाच्या महिलांसोबत कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, अध्यक्ष सिया धुरी, सचिव संपदा प्रभू, अर्चना धुरी, सानिका चव्हाण, कांचन धुरी, मंगल मानेकर, दीपिका कदम, प्रीती कदम, शुभांगी मालप, प्रेमा म्हापसेकर, रजनी धुरी, शांती शर्मा, रविना परब, दीपाली लोके, निकिता बागवे, अनिशा धुरी, साधना चव्हाण, शोभा लोके, स्मिता केळुसकर, रतन चौगुले आदी महिला उपस्थित होत्या.
मालवण ते कातवड ओझर मार्गावर एकच बसफेरी सुरू आहे. मात्र कातवड गावातून सुमारे २५ ते ३० शालेय विद्यार्थी, बहुतांश महिला, ज्येष्ठ नागरिक बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जातात. यात सकाळी एकच बसफेरी सोडली जाते. इतर वेळी प्रवाशांना खैदा- ओझर येथे उतरून सुमारे तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागते. ग्रामस्थांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सकाळी, दुपारी व सायंकाळी मालवण खैदा- कातवड ओझर मालवण अशी नवीन बसफेरी सोडण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत नवीन बसफेरी सोडत नाही तोपर्यंत मालवण कुडोपी एसटी बस खैदा- कातवड गावातूनच सोडावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आगारव्यवस्थापक बोधे यांनी वरिष्ठ अधिकार्‍याशी चर्चा करून बसफेरीचे नियोजन करू असे आश्वासन दिले.
दरम्यान येथील दौर्‍यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांची महिलांनी भेट घेत याप्रश्नी लक्ष वेधले. खैदा-कातवड मार्गावरील बसफेरी बंद करून कोळंब पुलावरून ती सोडण्याची मागणी सभापती, उपसभापती, कुडोपी ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांकडे केली. यामुळे खैदा-कातवडमधील विद्यार्थी, ग्रामस्थांची गैरसोय होणार असल्याचे आमदार नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. जर सभापतींच्या मागणीवर एसटी वाहतूक बंद केली तर खैदा-कातवड गावातून नवीन बसफेरी सुरू करू असे आश्वासन आमदारांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

\