कॅम्प येथील गटार खोल करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
वेंगुर्ले ता.१७:
शहरातील कॅम्प येथे काल मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे गटारे तुडुंब भरून रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे पादचारी नागरिकांना व वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांच्या सुचनेनुसार आज मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी या भागाची पाहणी करून तात्काळ त्या भागातील गटार खोल करावेत असे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. मात्र पावसानंतर नगरपरिषदेला जाग आल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
वेंगुर्ला तालुक्यात काल मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात पॉवरहाऊस भागात गटारे तुडुंब भरून वाहत असल्याने बाजूच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते याचा त्रास पादचाऱ्यांसोबत वाहन चालकानाही झाला होता. यामुळे ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबत वेंगुर्ला उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांच्या सूचनेनुसार येथील स्थानिक ग्रामस्थ व कर्मचार्यांसोबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी नवीन म्हाडा इमारती शेजारील गटारांची पाहणी केली. यावेळी म्हाडा वसाहती शेजारील गटार तात्काळ खोल करावेत असा आदेश मुख्याधिकारी साबळे यांनी अधिकारी सागर चौधरी यांना दिला. तसेच म्हाडा वसाहतीने बाजूच्या गटारावर योग्य ती कारवाई करावी अशी सूचना केली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, शिवसेनेचे अजित राऊळ, शाखा प्रमुख बाळू परब, मणी रेवणकर, बाळा परब, आबा कामत- वालावलकर, बाळू वेंगुर्लेकर यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.