अरुणा प्रकल्पग्रस्तांची उद्या पुनर्वसन गावठाणात महत्वपूर्ण बैठक

2

वैभववाडी ता.१७: अरुणा मध्यम धरण प्रकल्प ग्रस्तांची घरे सध्या पाण्यात आहेत. त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते बेघर झाले आहेत. बेघर झालेल्या अशा प्रकल्प ग्रस्तांची अत्यंत महत्त्वाची बैठक उद्या १८ जुलै रोजी मांगवली पुनर्वसन गावठाणात आयोजित करण्यात आली आहे.
मोबदला नाही, भुखंड नाही, पुनर्वसनाचा पत्ता नाही. पत्राशेड मध्ये रहायला आम्ही सगळे जनावरे नाहीत. अशी भुमिका घेत आखवणे, नागपवाडी, भोम गावच्या सुमारे ३५० पेक्षा जादा कुटुंबानी २७ मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना पाण्यात बुडुन मरू पण गाव सोडणार नाही अशी भुमिका घेत निवेदन सादर केले होते.
प्रकल्प ग्रस्त आपली घरे न काढता गावातच ठाण मांडून होती. त्यामुळे प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला होता. दरम्यान ७, ८, ९, १० जुलैला प्रकल्प अधिका-यांनी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात धरणात पाणी साठा केल्याने प्रकल्प ग्रस्तांची घरे पाण्याखाली गेली व गावात ठाण मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना दुदेँवाने गाव सोडावे लागले.
गेले दहा बारा दिवस बेघर झालेल्या प्रकल्प ग्रस्तांची प्रशासकीय यंत्रणेने साधी चौकशी केलेली नाही. या पार्श्वभूमीवर बेघर झालेल्या प्रकल्प ग्रस्तांची महत्वाची बैठक उद्या मांगवली पुनर्वसन गावठाणात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला बेघर झालेल्या प्रकल्प ग्रस्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे, माजी सरपंच सुरेश नागप, अजय नागप, प्रकाश सावंत, रामदास नागप, सूर्यकांत नागप, सुरेश जाधव, विजय भालेकर, विलास कदम, यांनी केले आहे.

3

4