जिल्हावासीयांच्या घरात लक्ष्मीची पावले नांदावीत यासाठी कायम प्रयत्नशील राहणार

235
2
Google search engine
Google search engine

पालकमंत्री केसरकर: शिवराम राजे व मच्छिंद्र कांबळीचे स्मारक होणे हा भाग्याचा दिवस

सावंतवाडी / अमोल टेंबकर, ता. १७ : जिल्ह्यातील लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी येथील प्रत्येकांच्या घरात लक्ष्मींची पावले नांदण्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील आणि त्या माध्यमातून विविध रोजगार देणारे प्रकल्प याठीकाणी आणून जिल्हा राज्यात आणि देशात नंबर एकला आणण्यासाठी माझे कायम प्रयत्न असतील असा विश्वास पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त केला आहे
दरम्यान आगामी काळात सावंतवाडी शिवरामराजे, मच्छींद्र कांबळी यांचे स्मारक उभारण्याबरोबर मल्टीहॉस्पीटलसारखा प्रश्न सोडवून आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि माझ्या पाठीराख्याच्या आशिर्वादाने मला यात निश्चितच यश मिळेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.
श्री. केसरकर यांचा वाढदिवस उद्या ता. 18 ला होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ब्रेकींग मालवणीला दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या मंत्रीपदाच्या काळात झालेल्या कामाचा धावता आढावा घेतला.
श्री. केसरकर म्हणाले, गेल्या पाच वर्षाच्या काळात मी शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला. यात रस्ते, पाणी, विज अशा प्रश्नासोबत पर्यटनावर आधारीत प्रकल्प आणि त्या माध्यमातून येथील लोकांना रोजगार मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले, या ठिकाणी जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून येथील पर्यटन वाढत जावे. यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती व्हावी यासाठी स्पर्धा परिक्षांचे शिक्षण देणारी यंत्रणा या ठिकाणी येत्या काही दिवसात सुरू होणार आहे तर त्यात प्रामुख्याने व्हर्च्युअल क्लासरुमसारखी वेगळी कल्पना जिल्ह्यात प्रथमच या ठिकाणी राबविली जाणार आहे.
ते पुढे म्हणाले, सागरी पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी आयएनएस गंगासारखी पाणबुडी या ठिकाणी मागविण्यात आली आहे. त्या माध्यमातून समुद्राखालचे जग अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी या अत्याधुनिक नौका आणण्यात येणार आहे. त्याचा फायदा 12 वावच्या आत ट्रॉलर्सकडून बेकायदेशीर होणार्‍या मासेमारीला आळा बसण्यासाठी होणार आह.
आंबोली येथे फुलपाखरु गार्डन आणि पारपोली गावाला फुलपाखरांचे गाव जाहिर करण्यात आले असून त्या माध्यमातून त्यांचा विकास केला जाणार आहे. त्याचबरोबर आंबोलीच्या धबधब्यांचा विकास करण्याबरोबर त्या ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर जाणार्‍या पर्यटकांना सोईचे व्हावे यासाठी वेगळे प्रयत्न केले जाणार आहेत. यात सावडाव आणि नापणे या अन्य दोन धबधब्यांचा समावेश असणार आहे.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षात नियोजनच्या माध्यमातून जिल्ह्याला म्हणावा तसा निधी मिळाला नव्हता; मात्र आपण पालकमंत्री झाल्यानंंतर 80 कोटीचा आकडा थेट दोनशे पंचवीस कोटीवर नेण्यात आला तर चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शंभर कोटी रुपये अधिकचा निधी देण्यात आला आहे. त्या माध्यमातून शेतकरी आणि विशेषतः महिला सक्षम होण्यासाठी बे्रक अ‍ॅण्ड बे्रक फास्ट ही स्कीम त्याचबरोबर कोंबडी वाटप गाई वाटप करण्यात येणार आहे.
स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्यानंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कोणतीही उपाययोजना किंवा निधी आणण्यात आला नव्हता. मात्र मी मंत्री झाल्यानंतर सांवतवाडी दोडामार्ग या दोन तालुक्यासाठी मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मंजूर करुन घेतले आहे. त्यात सावंतवाडीत कार्डीयोलॉजी, एन्कॉलॉजी, न्यूरॉलॉजी, युरॉलॉजी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कुडाळ येथील हॉस्पीटल वाढविण्यात येणार आहे तर वेंगुर्ला येथील हॉस्पीटलचे काम सुरू आहे असे श्री. केसरकर म्हणाले.
सावंतवाडीकरांसह दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील लोकांनी दाखविलेल्या विशेष प्रेमाचा उतराई होण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यात माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावून भविष्यता येथील जनतेला स्वयंरोजगार निर्माण करून देण्याकडे माझे प्रयत्न सुरू असतील.