आमदार वैभव नाईक यांच्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना…
मालवण, ता. १७ : आचऱ्यातील वीज वाहिन्या व विद्युत खांब नुतनीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आज आमदार वैभव नाईक यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना केल्या.
आचरा भागातील वीज समस्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांसमवेत आचरा वीज उपकेंद्रास भेट दिली. यावेळी कार्यकारी अभियंता संजय गवळी, अधिकारी श्री. सिंग यांच्याशी चर्चा करून वीज समस्यांच्या व उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी विजेच्या विविध समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. या समस्याचे तातडीने निवारण करण्याच्या सुचना तसेच गणेश चतुर्थी सण जवळ येत असल्याने वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी श्री. गवळी यांना केल्या. सर्व वीज समस्या सोडविण्याबरोबरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले. आचरा भागात वीज वाहिन्या, विद्युत खांब नूतनीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी आमदार नाईक यांनी केल्या
समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे आचरा येथील मुख्य वीज वाहिनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही वीज वाहिनी बदलण्यात यावी. तसेच ज्याठिकाणी विद्युत खांब जीर्ण झाले आहेत ते बदलण्याची कार्यवाही करावी. आवश्यक ठिकाणी नवीन विद्युत रोहित्र बसवावेत, लाईन शिफ्टिंग, लाईन कन्व्हर्जनची कामे मार्गी लावावीत, मुख्य वीज वाहिनीवर ट्रीपर बसवावेत अशा सूचनाही आमदार नाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
वायंगणी कालावल सडयेवाडी येथे सिंगलफेज लाईन थ्रीफेज करण्याच्या मागणी ग्रामस्थांनी केली ती मान्य करण्यात आली. आचरा हिर्लेवाडी , खोतवाडी या भागात शेतीच्या मळ्यातून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. ते खांब रस्त्याचा बाजूने हलविण्यात यावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर यांनी केली. पावसाळ्यानंतर ते खांब बदलण्याची कार्यवाही करू असे श्री. गवळी यांनी सांगितले.
गणेश चतुर्थी सण जवळ येत असल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने आतापासूनच उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावर गवळी यांनी दिलेल्या सर्व सूचनांची अमंलबजावणी करण्यात येईल. वीज खांब , उपलब्ध असून जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्यात येतील. मुख्य वीज वाहिनी बदलण्याचे काम व खांब हलविण्याचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण केले जाईल. अतिरीक्त दोन विद्युत रोहित्र उपलब्ध केले आहेत. गणेश चतुर्थी सणात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जातील असे श्री. गवळी यांनी स्पष्ट केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, विभाग प्रमुख उदय दुखंडे, उपसरपंच अनिल गावकर,भाऊ परब, नारायण कुबल, समीर लब्दे, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर, सदानंद घाडी , श्याम घाडी , राजन गावकर, श्री. मुजावर, रुपेश घाडी
यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.