अर्चना घारे परब; महिला बचत गटांना मार्गदर्शन…
वेंगुर्ले, ता. १८ : महिला सक्षमीकरणामध्ये महिला बचत गटांची मोठी भूमिका आहे.बचत गटांच्या निमित्ताने महिला एकत्र येत असून त्या एकमेकांचे कौटुंबिक,आर्थिक आणि सामाजिक प्रश्न समजून घेतात,त्यावर मिळून उत्तरं शोधतात आणि पुढे जातात. त्यामुळे “गट कार्यक्षम तर प्रत्येक महिला सक्षम” असे प्रतिपादन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब यांनी आज येथे केले.अर्चना फाऊंडेशनच्यावतीने शिरोडा येथे महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी त्या बोलत होत्या.
ग्रामीण भागातील महिला अधिक कार्यक्षम, मेहनती, विविध कौशल्य असलेल्या असतात. एकत्र येण्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या निर्णय क्षमता विकसित होतात. अधिकाधिक महिलांना बचत गट बनविण्यासाठी,त्यात सामील होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तयार असलेले, होणारे बचत गट कार्यक्षम कसे होतील हे बघितले पाहिजे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक आर्थिक आणि सामाजिक उपक्रम करता येतात. छोट्या छोट्या व्यवसायांमधून आधी भांडवल उभे केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असल्यास काही व्यावसायिक बाबींचे प्रशिक्षण घेतले पाहिजे आणि आपले व्यवसाय वाढविले पाहिजे. आज लज्जतसारखी कंपनी या माध्यमातून उभी आहे.बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी बँकाचे देखील पाठबळ मिळते. त्याचा लाभ घेतला पाहिजे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या की त्या सामाजिक बदलांसाठी देखील अग्रणी आणि आग्रही असतात.त्यामुळे सामाजिक प्रगती करायची असेल तर प्रत्येक महिला सक्षम केली पाहिजे असे प्रतिपादन अर्चना घारे परब यांनी या निमित्ताने केले.
यावेळी सरपंच मा.अजित नातू, श्रीम.परब, गौरी परब, मनस्वी गावडे, अक्षता परब, गीतांजली आचरेकर तसेच सखी, साई, धनलक्ष्मी, रमाई, भिमाई महिला बचत गटाचे सदस्य, गावकरी महिला उपस्थित होत्या.