बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्वाभिमानचा बांधकामला घेराव…

2

पंधरा दिवसात रस्ता सुरळीत करा,अन्यथा रास्ता रोकोचा इशारा…

बांदा ता.१८:  येथील बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरवस्थेबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या दोडामार्ग व बांद्यातील पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना घेराव घालत जाब विचारला.येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास संपूर्ण मार्ग रोखून धरण्यात येईल असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिला.
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून आतापर्यंत झालेल्या अपघातांना आपण जबाबदार असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.अर्धा पावसाळा संपला असून गणेश चतुर्थीच्या तोंडावर आपल्या खात्याचे नियोजन शून्य असल्याचा आरोप करत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.देसाई यांनी येत्या मंगळवारी बांदा येथे येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिल्या नंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली.
यावेळी कार्यकारी अभियंता देसाई यांनी शाखा अभियंता विजय चव्हाण यांना तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून पावसाळी डांबरीकरण करण्याच्या सूचना दिल्यात.आम्ही वेळोवेळी शाखा अभियंत्यांना रस्त्याच्या दुरावस्थेबाबत विचारणा केली आहे.मात्र प्रत्येकवेळी याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आतापर्यंत कित्येक अपघात झाले आहेत.आपण कोणतीही सबब न देता प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करावी.लोकांच्या होणाऱ्या नुकसानिस आपण जबाबदार आहात.आपण जिओ कंपनीला खोदाईची परवानगी कोणत्या अधिकारात दिली?त्यामुळे साईडपट्टी पूर्णपणे खचल्याने आतापर्यंत शेकडो वाहने रस्त्याच्या बाजूला रुतली आहेत.याला सर्वस्वी जबाबदार आपले खाते आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी एकनाथ नाडकर्णी, संजू परब, प्रमोद कामत,रवींद्र मडगावकर अंकुश जाधव,राजू निंबाळकर,संतोष नानचे, अक्रम खान,प्रवीण देसाई,जावेद खतीब,सुधीर वराडकर,विनेश गवस, मधुकर देसाई आदी उपस्थित होते.

19

4