अँँड.रमाकांत खलप;राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांची प्रथम पुण्यतीथी साजरी…
सावंतवाडी ता.१८: येथील संस्थानच्या राजमाता कै.ह.हा. सत्वशिलादेवी भोसले हे या मातीतील रत्न आहेत.त्यांनी शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून देऊन दिलेले योगदान अमुल्य आहे.संस्थानच्या गंजिफा या हस्तकलेला ऐतिहासिक वारसा असून या कलेला त्यांनी राष्ट्रीय दर्जा मिळवून दिला.त्यांच्या स्मृती कायम परिसाप्रमाणे जोपासून त्यांचे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु ठेवणे हेच त्यांच्या स्मृतींना अभिवादन ठरेल,असे प्रतिपादन गोव्याचे माजी कायदामंत्री अॅड.रमाकांत खलप यांनी आज येथे केले.येथील राजमाता श्रीमंत सत्वशिलादेवी भोसले यांचा प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अॅड. खलप पुढे म्हणाले,येथील संस्थानच्या राजमाता या कलाप्रेमी होत्या.संस्थानात येणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी सुहास्यवदनाने स्वागत करुन आत्मियतेचे नाते निर्माण केले.या राजमातांचे आठवावे रुप,त्यांचा आठवावा प्रताप,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्याग, परिश्रम व निष्ठा हे काही गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.त्यांनी बहुमुल्य योगदानातून निर्माण केलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये झोकून देऊन काम केले.आपल्या परिश्रमाने संस्थेला बळकटी प्राप्त करुन दिली.मात्र काहींनी संस्थेची घटना बदलण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तीन विभाग व्हावेत अशी मागणी जोर धरत आहे. कोकणचा स्वतंत्र विभाग होऊन दक्षिण कोकणमध्ये औद्योगिक संस्था, मेडीकल महाविद्यालय तसेच मोठमोठ्या शैक्षणिक संस्था याव्यात जेणेकरुन कोकणाला जागतिक स्तरावर मान मिळेल, असे ते म्हणाले.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले,राणीसाहेब शुभदादेवी भोसले,युवराज लखमराजे भोसले, संस्थानचे राजगुरु प.पू. भारती महाराज,युवराज्ञी श्रद्धादेवी भोसले,भोसले नॉलेज सिटीचे चेअरमन अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदी उपस्थित होते.