महादेव जानकर ः कोकणातील लोक संयमी पण स्पर्धा परीक्षेत उतरले पाहिजेत
सावंतवाडी, ता. 18 ः पालकमंत्री दिपक केसरकर भविष्यात कॅबिनेट मंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी येथील जनतेने प्रयत्न करावे. आवश्यक वाटल्यास मी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घालीन. परंतू या विकास पुरुषाला पुन्हा प्रक्रियेत न्या, असे आवाहन मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले.
कोकणातील लोक संयमी म्हणून ओळखले जातात. परंतू येथील लोक स्पर्धा परीक्षात यशस्वी होणे गरजेचे आहे. त्यासाठी केसरकरांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या उपक्रमाचा फायदा घ्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी श्री. जानकर आले होते. यावेळी त्यांनी केसरकरांबाबत गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, मी जरी मत्स्य व पशुसंवर्धन विभागाचा मंत्री असलो तरी अर्थ खाते श्री. केसरकर यांच्याकडेच आहे. त्यामुळे चांदा ते बांदा या योजनेसह अन्य विविध योजनांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी त्यांनीच दिला आहे. येथील शेतकर्यांच्या मुलांनी चांदा ते बांदा या योजनेचा स्विकार केल्यास तर निश्चितच ते भविष्यातील उद्योगपती बनतील असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, गेल्या चार वर्षापूर्वी परराज्यातून अंडी, मटण आयात करावे लागत होते. परंतू आता परिस्थिती बदलली आहे. येथील शेतकरी व महिलांनी अंडी व पशुसंवर्धनाकडे लक्ष दिल्यास निश्चितच राज्याचे उत्पन्न वाढू शकते. त्यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी आपण उपलब्ध करून देऊ.