केसरकरांची वाढदिवसादिनी मतदारांना भावनिक साद
सावंतवाडी, ता. १८ : तुमच्यामुळेच मी आमदार झालो, मंत्री झालो परंतू काही झाले तरी मी तुम्हाला विसरणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असतील अशी भावनीक साद पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थितांना घातली.
दरम्यान मी मंत्री असूनसुद्धा माझ्या आजुबाजूला मी भाषण करत असताना इतके लोक जमले याचा अर्थ हे त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मात्र पूर्वीच्या लोकांमध्ये व मंत्र्यांमध्ये अशी जवळीकता दिसत नव्हती, असाही टोला यावेळी त्यांनी लगावला.
श्री. केसरकर यांचा वाढदिवस आज येथील बॅ. नाथ पै सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, संदेश पारकर, नंदू घाटे, सौ. पल्लवी केसरकर, सोनाली केसरकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जम्प नेटवर्कचे हर्षवर्धन साबळे, विजय कोरगावकर, मुकुंद राघवन, जयंत जावडेकर, महेश कांदळगावकर, अन्नपूर्णा कोरगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा संपत्तीची खाण आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारे लोक सुजलाम, सुफलाम व्हावेत या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले आहेत. त्याचा फायदा तळागाळातील लोकांना व्हावा या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.
या ठिकाणी मी काम करत असताना माझ्यावर टिका केली जाते. परंतू माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. मी आक्रमक वागू शकतो. परंतू माझ्या कामाचा कोणाला त्रास होणार नाही याची मी दक्षता घेतो. कडक वागून शिक्षा देणे माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे येथील विरोधकांनीसुद्धा याचा बोध घ्यावा. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रसंगी सर्वांना सोबत घेवून जाण्याची आमची तयारी आहे. येणार्या काळात सावंतवाडी मतदार संघात 12 क्वॉयर निर्मिती करणारे कारखाने उभारू. या माध्यमातून प्रत्येकी 150 महिलांना रोजगार देण्यात येणार आहे. सावंतवाडी रुग्णालयाचे सुद्धा खासगी हॉस्पीटलच्या धर्तीवर आधुनिकीकरण होणार आहे. त्यामुळे याचा फायदा येथील जनतेने घ्यावा. कोंबडी आणि गाईंचे पालन करणार्या सर्व लोकांना मागणीनुसार वाटप करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. जास्तीत जास्त लोकांच्या घरात लक्ष्मी नांदावी यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत, असे श्री. केसरकर यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्यावर उपस्थित अनेक हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी राघोजी सावंत, रफिक मेमन, दया परब, डॉ. राजेश नवांगुळ, मिलींद खानोलकर, नीरज देसाई, सुनील गोगटे आदींनी शुभेच्छा दिल्या.