मोठ्या मुलाविरोधात पित्याची कणकवली पोलिसांत तक्रार
कणकवली, ता.18 ः घरात कुणी नसल्याची संधी साधून फोंडाघाट खैराटेवाडी येथील पांडुरंग खरात यांचा मोठा मुलगा लक्ष्मण (वय 19) हा घरातील रोख रक्कम, सर्व दागिने आदी 2 लाख 40 हजाराचा ऐवज तसेच आधारकार्ड, बँकांची पासबुक आदी साहित्य लंपास करून पसार झाला आहे. याबाबतची फिर्याद पित्यानेच आज कणकवली पोलिसांत नोंदवली. दरम्यान त्या मुलाने यापूर्वीही आपल्या बहिणीच्या लग्नासाठी जमविलेली 1 लाख 70 रूपयांची रक्कम घेऊन फरार झाला होता.
फोंडाघाट खैराटेवाडी येथील पांडुरंग भागोजी खरात (वय 48, रा.फोंडाघाट खैराटवाडी) हे आपल्या पत्नीसह काल (ता.14) घरापासून दोन किलोमिटर अंतरावरील भातशेती कामासाठी गेले होते. तर त्यांचा छोटा मुलगा सकाळी सहा वाजता फोंडाघाट कॉलेजला गेला होता. दुपारी 12 वाजता पांडुरंग खरात घरी आले तेव्हा दरवाजाचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडले असल्याचे दिसून आले. तसेच घराच्या कपाटातील दागिने, रोख रक्कम लंपास झाल्याची बाब लक्षात आली. ही चोरी फरार असलेल्या आपल्या मुलानेच केली असावी असा त्यांचा संशय बळावला. खरात हे दुपारी फोंडाघाट बाजारात आले असता गावातील धावू गावडे यांनी त्याला आज तुमचा मोठा मुलगा दिसला होता. त्याने दिवा गाडीतून मुंबईला जाणार असल्याचे सांगितल्याची माहिती खरात यांना दिली. त्यामुळे खरात यांना घरातील चोरी आपल्या मुलानेच केल्याची खात्री पटली. त्यांनतर त्यांनी आपला मुलगा लक्ष्मण याच्या विरोधात कणकवली पोलिसांत चोरीची फिर्याद दिली.
लक्ष्मण खरात हा वळींवडे येथील कृषि महाविद्यालयात तिसर्या वर्षात शिक्षण घेत होता. नोव्हेंबर 2018 मध्ये त्याने 1 लाख 70 हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर तो घरी परतला नव्हता. तर पांडुरंग खरात यांनीही त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. मात्र आज घरातील सर्व ऐवज, बँक पासबुक, सर्वांची आधारकार्ड व इतर कागदपत्रे घेऊन मोठा मुलगा पसार झाला असल्याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 16 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या डवल्या असलेले मंगळसूत्र, 8 हजाराचे सिंगल डवली असलेले मंगळसूत्र, 75 हजार रूपये किंमतीचे सुमारे पावणे तीन तोळ्याचे मंगळसूत्र, तीन तोळ्याचे 1 लाख 5 हजार किंमतीचे नवीन मंगळसूत्र, 15 हजार रुपयांच्या अंगठ्या, 5 हजाराचे चांदीचे कडे, 16 हजार रुपयांच्या नोटा तसेच घरातील सर्व मंडळींचे आधारकार्ड, महाराष्ट्र बँकेची तीन पासबुके, जमिनीचे कागदपत्र, रेशनकार्ड आदींचाही समावेश आहे.
संशयित आरोपी लक्ष्मण खरात याने मे महिन्यात देखील चोरी केली होती.