केसरकरांनी वाढदिवसादिवशी केली जुन्या मित्राची तारिफ

266
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रविण भोसलेंबाबत गौरवोद्गार : मंत्री झालो तरी बडेजाव नसल्याचे केले स्पष्ट

सावंतवाडी / अमोल टेंबकर, ता. १८ : येथील संस्थानाची परंपरा शिवरामराजे भोसलेंनंतर भाईसाहेब सावंत यांनी कायम ठेवली. आपणसुद्धा मंत्री झाल्यानंतर कधी बडेजाव केला नाही. आज माझे घरही साधेच आहे. प्रविण भोसले मंत्री होऊनसुद्धा आजही कौलाच्या घरात राहतात, अशी आठवण काढत पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज आपल्या जुन्या मित्राच्या आठवणींना उजाळा करून दिला.
श्री. केसरकर हे गेली पाच वर्षे मंत्री म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी मिस्टर क्लीन म्हणून आपली राज्यात ओळख निर्माण केली आहे. राजकारणात गेल्यानंतर अनेकजण पैसे कमावतात अशी परिस्थिती असते. परंतू केसरकर यांनी आपली संपत्ती विकून राजकारण आणि समाजकारण सुरू ठेवले आहे, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
आज झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सभेत त्यांनी जुन्या मैत्रीला आणि श्री. भोसले यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गौरवोद्गार काढले आणि अनेक वर्षे ते मित्रापासून दूर राहिले असले तरी त्यांनी हक्काने भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिला.
माजी राज्यमंत्री प्रविण भोसले व दिपक केसरकर एकेकाळचे घनिष्ठ मित्र होते. श्री. भोसले यांनी केसरकरांना आपल्या हाताच्या बोटाला धरून अगदी महाविद्यालयीन वयात राजकारणात आणले. त्यानंतर त्यांना राजकारणात यश मिळत गेले. रोटरी क्लबचे अध्यक्ष ते नगराध्यक्ष असा केसरकरांचा प्रवास राहिला. मात्र त्यानंतर या दोन्ही मित्रात बिनसले व घनिष्ठ मित्र असलेले हे दोघे एकमेकांचे विरोधक ठरले.
काही वर्षापूर्वी ही मैत्री तुटली. त्यानंतर केसरकर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. प्रविण भोसले राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेले आणि पुन्हा राष्ट्रवादीत आले. मात्र यानंतर त्या दोघातील दुरावा कायम राहिला. दोघांनी कधीकाळी एकमेकांना काही विषयावरून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतू आज झालेल्या पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. केसरकर यांनी श्री. भोसले यांचा आवर्जुन उल्लेख केला. आपण मंत्री झालो मात्र कोणताही बडेजाव ठेवलेला नाही. सावंतवाडी संस्थानची परंपरा कायम राखली, असे सांगत तत्कालीन आमदार शिवरामराजे हे राजघराण्यातील असूनसुद्धा साधेच राहिले. त्यानंतर भाईसाहेब सावंत व प्रविण भोसले मंत्री होवूनसुद्धा साधे राहिले. आजही त्यांची घरे आधी होती तशीच आहेत. मी सुद्धा साधाच राहिलो. कधी बडेजाव केला नाही असे केसरकर म्हणाले. त्यांनी अनेक दिवसांनी आपल्या भाषणात भोसले यांचे नाव घेतल्यामुळे उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.

\