कासार्डे हाणामारी प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

2

कणकवली, ता.18 : हायवे ठेकेदार केसीसी बिल्डकॉनच्या कासार्डे येथील बेस कॅम्प आवारात झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिस कोठडीत असलेले स्थानिक ग्रामस्थ आणि बिल्डकॉनचे कर्मचारी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
रस्त्यावरील खड्डे का बुजवत नाही याचा जाब विचारण्यास गेलेले कासार्डे-तळेरेतील काही युवक आणि केसीसी बिल्डकॉनचे कर्मचारी यांच्यात 12 जुलै रोजी रात्री 11.20 वाजता वादंग झाला. त्यानंतर या दोन्ही गटांत हाणामारी झाली होती. यात कासार्डे येथील प्रथमेश उर्फ सनी रणजित पाताडे याने आपल्या साथीदारांसह मारहाण केल्याची तक्रार केसीसी बिल्डकॉनच्या व्यवस्थापकाने केली होती. तर प्रेषित महाडिक याने दिलेल्या फिर्यादीनुसार केसीसी बिल्डकॉनच्या कामगारांनी प्रेषितच्या डोक्यावर जीवघेणा हल्ला करत त्याच्या साथीदारांना लोखंडी शिग आणि दांड्याने मारहाण केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींना 18 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोन्ही गटातील सर्व आरोपींना कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश सलीम जमादार यांनी सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन्ही गटातील आरोपींची सावंतवाडी जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान अ‍ॅडव्होकेट उमेश सावंत यांनी दोन्ही गटातील आरोपींचा जामीनसाठी अर्ज जिल्हा न्यायालयात सादर केला असून पोलिसांचे म्हणणे मांडल्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

4

4