सभापती बद्दलचा आमचा गैरसमज दूर झाला…

400
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कातवड मधील महिलांनी केले स्पष्ट ; कुडोपी बसफेरी प्रकरण…

मालवण, ता. १८ : कुडोपी बसफेरी बंद करण्यावरून सभापती सोनाली कोदे यांच्याबाबत झालेला गैरसमज चुकीच्या माहितीमुळे झाला होता. मात्र सभापतींनी असे काही न म्हटल्याने त्यांच्याविषयीचा गैरसमज दूर झाला असल्याचे कातवड मधील संबंधित महिलांनी आज स्पष्ट केले.
दरम्यान शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कातवड-खैदा मार्गावर नियमित बसफेरीबरोबर दुपारी व सायंकाळी अशा दोन नव्या बसफेर्‍या सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी महिलांनी सभापती सोनाली कोदे यांच्याकडे केली. त्यानुसार यासंदर्भात उद्या पंचायत समितीमध्ये बैठक घेतली जाईल असे स्पष्ट केले.
मालवण कुडोपी बसफेरी खैदा-कातवड मार्गे जात असल्याने कुडोपीतील शालेय विद्यार्थी रात्री आठ वाजेपर्यंत घरी पोचत असल्याने कुडोपीतील महिलांनी सभापती, उपसभापती यांची भेट घेत लक्ष वेधल्यानंतर सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, कुडोपी ग्रामस्थ महिलांनी आगारव्यवस्थापक नरेंद्र बोधे यांची भेट घेतली होती. यावेळी मालवण कुडोपी बसफेरी कोळंब पुलावरून नियमित सोडण्यात यावी अशी मागणी केली होती. त्याचबरोबर खैदा-कातवड या मार्गावर नवीन बसफेरी सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र मालवण कुडोपी बसफेरी सभापतींनी बंद केल्यानेच ती गावात आली नाही. परिणामी शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याने कातवडमधील महिला ग्रामस्थ संतप्त बनल्या. त्यांनी काल आगारव्यवस्थापकांची भेट घेत लक्ष वेधले. यावेळी आमच्या मार्गावरील बसफेरी बंद करण्याचा अधिकार सभापतींना कोणी दिला असा प्रश्‍न करत याचा जाब सभापतींना विचारू असे संतप्त महिलांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात आज कातवड येथे महिलांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीस सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, साधना चव्हाण, अर्चना धुरी, सिया धुरी, निकिता बागवे, सीमा धुरी, शुभांगी मालप, सानिका धुरी, लक्ष्मी शेलटकर, मंगल मानेकर, लता राणे, रत्नमाला वाघमारे, चांदणी लोके, सुजाता कदम, विमल चव्हाण, रतन चौगुले, मंगल मोहिते, मिनाक्षी मोहिते, प्रीती कदम, सुरेखा चव्हाण, दीक्षा कोरगावकर, दर्शना बागवे, शोभा लोके, रश्मी धुरी, सुजाता चौगुले, प्रेमा म्हापसेकर आदी महिला उपस्थित होत्या.
यावेळी कातवड येथील महिलांनी कुडोपी बसफेरी सभापतींनी बंद करण्यास सांगितल्याचा आमचा गैरसमज झाला त्यामुळेच आम्ही सभापतींवर निशाणा साधला. मात्र सभापतींनी बसफेरी बंद करण्याचे आगार व्यवस्थापकांना सांगितले नसल्याची माहिती मिळाल्याने जो गैरसमज झाला होता तो दूर झाल्याचे महिलांनी स्पष्ट केले. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे कातवड गावात नियमित बसफेरीबरोबर दुपारी एक व सायंकाळी साडे पाच वाजता कोळंब पुलावरून बसफेरी सुरू करण्यासाठी सभापती व कोळंब सरपंच यांनी प्रयत्न करावेत असे महिलांनी स्पष्ट केले. याची कार्यवाही न झाल्यास कणकवली विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात धडक देऊ असा इशारा महिलांनी दिला. याप्रश्‍नी उद्या सकाळी पंचायत समिती येथे बैठक घेऊन चर्चा केली जाईल. नवीन दोन बसफेर्‍या सुरू करण्यासंदर्भात विभाग नियंत्रकांची भेट घेण्याचेही ठरविले जाईल असे सभापती कोदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

\