मुंबईत २३ ला कार्यक्रम: सावंतवाडीत आंदोलन झाल्यामुळे बक्षीस ठरले होते कळीचा मुद्दा
सावंतवाडी/शुभम धुरी,ता.१८ : स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत राज्यातील नगरपालिकांना जाहीर करण्यात आलेली बक्षिसे देण्यासाठी शासनाकडून २३ जुलैची तारीख निश्चित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून सर्व नगरपालिकांना देण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी कणकवली व वेंगुर्ला या तीन नगरपालिकांचा समावेश आहे. दरम्यान ही बक्षिसे मिळण्यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष व सत्ताधारी विरोधकांनी आंदोलन पुकारले होते तर कणकवली नगराध्यक्ष यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे हा कळीचा मुद्दा ठरला होता. दरम्यान आज या वर्गाची पत्रे संबंधित पालिकांना आली आहेत. यात २३ जुलैला दुपारी ३ वाजता नरिमन पॉइंट येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून यावेळी नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.