कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलून दुसरी बसवणार?

275
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईची सध्याची मूर्ती बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्याची मूर्ती भग्न झाल्याने दुसरी मूर्ती बसवणार असल्याची चर्चा रंगली आहे. कोल्हापूरचे शिल्पकार अशोक सुतार यांनी तयार केलेल्या या नवीन मूर्तीची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पाहणी केल्याने या चर्चेला उधाण आलं आहे.

वर्षानुवर्षे सुरु असलेला अभिषेक, मूर्तीची झालेली झीज आणि त्यावर झालेल्या रासायनिक प्रक्रियांमुळे सध्याची मूर्ती कमकुवत झाल्याचा काही जणांचा दावा आहे. त्यामुळेच सध्या असलेल्या प्राचीन मूर्तीसारखीच एक मूर्ती कोल्हापुरात घडवली जात आहे.

अर्थात देवस्थान समितीचा जो मतप्रवाह आहे, तसा सगळ्यांचाच नाही. अनेकांचा देवीची मूर्ती बदलण्यावर आक्षेप आहे.अर्थात हा निर्णय मोठा असल्याने एकांगी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

पुरातत्व विभागाकडून सध्याच्या मूर्तीच्या स्थितीची पाहणी करुन देवस्थान समिती याबाबत निर्णय घेणार आहे. तर धर्मसभा बोलावून मूर्ती बदलण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अंबाबाईची मूर्ती खरंच बदलली जाणार? की आधीचीच मूर्ती कायम राहणार? याची भक्तांमध्ये उत्सुकता आहे.

\