डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहिर

247
2

सिंधुदुर्गनगरी ता.१९: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने सलग दुसऱ्यावर्षी घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी जाहिर केला. या परीक्षेत चौथीमध्ये सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नं. 3 प्रशालेच्या स्वदा संदीप लकांबळे याने 96 टक्के गुण मिळवत तर सातवीमध्ये दोडामार्ग तालुक्यातील तेरवण नं 1 प्रशालेतील सुनयन सुनील फडके याने 90 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धा परीक्षेत सातवीमध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या मुलांना ऑगस्ट महिन्यात इस्रो सहल विमानाने घडविणार असल्याचे यावेळी सौ सावंत यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेला शिक्षण सभापती डॉ अनिशा दळवी, महिला व बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास कुबल, रामचंद्र आंगणे आदी उपस्थित होते.
चौथीमध्ये वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे नारकरवाडी प्रशालेतील अथर्व जयवंत मोरे याने 95.33 टक्के गुण मिळवत जिल्ह्यात द्वितीय तर कुडाळ तालुक्यातील वालावल हुमरमळा शाळेतील अथर्व प्रदीप गावडे याने 93.33 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे. सातवीमध्ये मालवण तालुक्यातील गोळवण नं 1 शाळेच्या राजकुमार आनंद दुखंडे याने 84.67 टक्के गुण मिळवत द्वितीय तर वैभववाडी तालुक्यातील नाधवडे ब्राम्हणदेव नवालादेवीवाडी प्रशालेतील प्रणय प्रकाश बोभाटे याने 82.67 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे. थीसाठी 3423 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यातील 1745 विद्यार्थी उत्तीर्ण होत 40.37 टक्के निकाल लागला आहे. सातवीसाठी 2133 विद्यार्थी बसले होते. त्यातील 306 विद्यार्थी उत्तीर्ण होत 14.35 टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी पेक्षा सातवीचा निकाल सुमारे पाच टक्के कमी लागला आहे. जिल्हा परिषदेत शिक्षण घेणारी 75 टक्के मुले या परिक्षेला बसली होती, असे यावेळी सांगण्यात आले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित पदाधिकारी व अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

4