महादेव जानकर; वैभववाडी-वायंबोशी येथे गावभेट कार्यक्रम
वैभववाडी, ता. १९ : राज्य सरकारच्या माध्यमातून धनगर समाजासाठी जेवढे करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच समाजाचा आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी आमच्या सरकारकडून १ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
वैभववाडी-वायंबोशी येथे गावभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा उपाध्यक्ष सज्जन रावराणे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, सभापती लक्ष्मण रावराणे, एडगाव सरपंच राजेंद्र सुतार, उपसरपंच रूक्मिणी शेळके, तानाजी गुरव, शाहू गुरव, गंगाराम अडुळकर, श्री. गाडे, पो. पा. कोंडू अडुळकर, ग्रा. पं. सदस्य हेमंत पवार, संतोष बोडके, सुर्यकांत बोडके, शंकर कोकरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री जानकर म्हणाले, एडगाव ते वायंबोशी रस्त्यासाठी ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले आहेत. तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेतून समाजाला १० लाख घरे देत आहोत. आमचे सरकार कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा आम्ही वारसा चालवत आहोत. या भागाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच काजू प्रकल्पासाठी १०० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. शेतकरी, महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी बँकांनी कर्ज दिले पाहिजे. यासाठी आम्ही गव्हर्नरांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोकणवासियांसाठी समुद्र किनाऱ्यावर टुरिस्ट टुरिझम सुरू करणार आहोत. यामुळे येथील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच फॉरेनला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.