देऊळवाडा आडवण स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य : नागरिकांतून तीव्र संताप…
मालवण, ता. १९ : शहरातील देऊळवाडा आडवण येथील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याची खड्ड्यामुळे बिकट अवस्था झाली असतानाच आता पावसात या रस्त्याची खड्डे व चिखलामुळे दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना तसेच एखाद्या मृत व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीत नेताना अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे मृत्यूनंतरही वैकुंठभूमीकडे जाणारी वाटही बिकट बनली असून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील आडवण भागात मालवण पालिकेच्यावतीने उभारलेली स्मशानभूमी आहे. देऊळवाडा येथील मुख्य रस्त्यावरून आडवण वायरी येथे जाणार्या रस्त्यावरच ही स्मशानभूमी आहे. मात्र स्मशानभूमीकडे जाणार्या या रस्त्याची अवस्था गेले अनेक वर्षांपासून बिकट बनली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून ये-जा करणे पादचार्यांना व वाहनचालकांना कठीण झाले आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत असताना पालिका, लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता तर पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे आणखी मोठे बनले असून रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी या मार्गावरून ये-जा करणार्या नागरिक व वाहनचालकांना मोठी कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे.
दरम्यान या रस्त्याला लागून महावितरणचे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या बाजूला महावितरणकडून बांधलेल्या इमारतीच्या कामावेळी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. एकीकडे या रस्त्यावरून जाताना नागरिकांची तारांबळ उडत असतानाच देऊळवाडा आडवण भागातील एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास तिचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी दिवसा किंवा रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत या रस्त्याने नेणार कसे असा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माणसाच्या मृत्यू नंतरही वैकुंठापर्यंत जाण्याच्या मार्गातही खड्डे पाठ सोडत नसल्याची संतापजनक भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.