आमदार वैभव नाईक ; कुडाळात कृषी अवजारांसाठी झाला सोडत कार्यक्रम…
कुडाळ, ता. १९ : शेतकर्यांना समृद्ध करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यातीलच एक कृषी यांत्रिकीकरण योजना आहे. ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. कुडाळ तालुक्यात गतवर्षी ९८६ शेतकर्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यासाठी तब्बल २ कोटी ७५ लाख निधी देण्यात आला. प्रस्ताव केलेल्या सर्व शेतकर्यांना कृषी अवजारे देण्यात आली. यावर्षी १ हजार ३९ अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी येथे दिली.
उन्नत शेती समृद्ध शेती अभियान मोहीम सन २०१९-२० कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत शेतकर्यांना कृषी अवजारांचे वाटप करण्यासाठी सोडत पद्धतीने शेतकरी निवड कार्यक्रम आज कुडाळ वासुदेवानंद ट्रेड सेंटरमध्ये झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. नाईक यांनी कुडाळ कृषी विभागाकडून चांगल्या पद्धतीने काम सुरु असून शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ दिला जात असल्याबद्दल कृषी विभाग, अधिकार्यांचे कौतुक केले.
ज्या शेतकर्यांनी विविध कृषी यंत्रे अवजारांसाठी ३० जूनपर्यत तालुकाकृषी विभागाकडे अर्ज सादर केले. त्यानुसार यावर्षी १ हजार ३९ अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या सर्व शेतकर्यांना विविध अवजारांचा लाभ देण्यासाठी सोडत पद्धतीने चिठ्ठीद्वारे शेतकरी निवड करण्यात आली. यामध्ये पॉवरटिलर, ट्रॅक्टर, व्हीडर, ब्रशकटर, मिनी भात मिल, फवारणी पंप आदी अवजारे शेतकर्यांना देण्यात येणार आहेत.
यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळी, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, पिंगुळी विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे, शरद धुरी, तानाजी सावंत, कृषी कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.