असनियेतील प्रकार : विजवाहिन्या तुटल्यामुळे घडली होती घटना
सावंतवाडी / दत्तप्रसाद पोकळे, ता. १९ : गाईला आणि आईला काही झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा जीव तळमळतो आणि तो त्या गाईला किंवा आईला वाचविण्यासाठी काहीही करू शकतो याचे उदाहरण आज असनिये येथे अनुभवता आले. विजवाहिन्या अंगावर पडल्यामुळे तडफडणार्या गाईला वाचविण्यासाठी तेथील ग्रामस्थ शरद सावंत आपल्या जीवाची पर्वा न करता धावले व विज कर्मचार्यांना कल्पना देऊन अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्न केला. असाच काहीसा प्रकार असनिये गावात घडला. रस्त्यात तुटून पडलेल्या विजवाहिन्यांचा विजपुरवठा सुरू होता. या प्रकाराची यत्किचींतही नसलेल्या मुक्या गाईने नेहमीप्रमाणे तेथून आपला प्रवास सुरू ठेवला. परंतू अचानक विजवाहिनीचा स्पर्श झाल्याने ती गाय रस्त्यावर हंबरत तडफडू लागली.
हा प्रकार तेथून जाणारे ग्रामस्थ शरद सावंत यांनी पाहिला. त्यांनी तेथून जाणार्या ग्रामस्थांना जमवून याची कल्पना विजवितरण कर्मचार्यांना दिली. त्यामुळे तात्काळ विजपुरवठा खंडीत करण्यात यश आले. त्यामुळे गाईचे प्राण वाचू शकले. या प्रकारानंतर गाईचे मालक श्री. बर्वे यांनी शरद सावंत व अन्य ग्रामस्थांचे आभार मानले. दरम्यान परिसरातील वाहिन्या जीर्ण झाल्या असून त्या धोकादायक अवस्थेत वारंवार तुटून पडत आहेत. त्यामुळे या पेक्षाही मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी तात्काळ यावर योग्यती कार्यवाही करून वाहिन्या बदलण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.