बंद इमारतीत सिगारेट पिणारे सात युवक संशयाच्या भोवर्‍यात…

367
2

माजगावातील घटना:पोलिसांना पाहून जंगलात पळ काढल्याने झाली चौकशी…

सावंतवाडी, ता.२०: माजगाव येथील बंद इमारतीत सिगारेट पिण्यासाठी जाणे शहरातील युवकांच्या टोळक्याला अंगलट आले. पोलिसांचा माग लागल्यानंतर त्यांनी आपल्या गाड्या टाकून जंगलाच्या दिशेने पलायन केले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. परंतू चौकशीअंती ते सिगारेट पिण्यासाठी त्याठिकाणी गेले होते असे निष्पन्न झाले.त्यामुळे त्यांना समज देऊन सोडण्यात आले.दरम्यान परिसरात असलेल्या इमारतीत राजरोसपणे दारु, सिगारेटच्या पार्ट्या केल्या जातात. अंमली पदार्थाचा वापर केला जातो,असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला आहे.संबंधित ठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी केली आहे.
हा प्रकार आज माजगाव-गुलाबीतिठा परिसरातील बंद इमारतीत घडला. शहरातील सहा ते सात युवक या बंद इमारतीत असल्याची माहिती तेथे झालेल्या चोरीच्या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली. ग्रामस्थांनी परिसरात रात्री झालेल्या चोरीत त्यांचा काही हात आहे का याबाबत चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार चोरीच्या पंचनाम्यासाठी गेलेले पोलिस त्या बंद इमारतीच्या दिशेने गेले. मात्र पोलिसांचा माग लागल्यानंतर त्या युवकांनी आपल्या गाड्या तेथेच टाकून जंगलात पलायन केले. दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान त्या युवकांची पोलिसांनी चौकशी केली. आपण सिगारेट पिण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो असे पकडण्यात आलेल्या दोघा युवकांकडून सांगण्यात आले. अखेर त्यांच्याकडून माहिती घेवून अन्य पाचही युवकांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले व समज देऊन सोडून देण्यात आले.

4