स्मार्टकार्ड अभावी विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड ; विद्यार्थ्यांनी वेधले युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष…
कुडाळ, ता. २० : गेले दहा दिवस कुडाळ एसटी आगारात तालुक्यात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना कागदी पासऐवजी स्मार्टकार्डसाठी नोंदणी करून मासिक एसटी पास म्हणून स्मार्टकार्ड सक्तीचे करण्यात आले होते. मात्र दहा दिवसानंतरही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्मार्टकार्ड उपलब्ध करून न दिल्याने तिकीटाची मूळ रक्कम देत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे तालुका व जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी युवासेनेच्या पदाधिकार्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी कणकवलीचे विभागीय वाहतूक अधिकारी व कुडाळचे आगारव्यवस्थापक यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी नवीन स्मार्टकार्ड उपलब्ध होईपर्यंत कागदी पास देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कुडाळ आगारात विद्यार्थ्यांना कागदी पास देण्यास सुरवात झाली आहे.
स्मार्टकार्डअभावी विद्यार्थ्याचे नुकसान होत असल्याने प्रियांका मुंबरकर, आर्या तेरसे, ओंकार पालव, चिंतन नाईक, आदेश तेंडोलकर, अनिषा मालवणकर, सोनाली जांभवडेकर, तितिक्षा बांबर्डेकर यांनी युवासेनेचे जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, जिल्हाप्रमुख गीतेश कडू व आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर यांच्याजवळ कैफियत मांडली. युवासेनेच्या पदाधिकार्यांनी याची तत्काळ दखल घेतली. श्री. चिंदरकर यांनी कुडाळ आगाराच्या सहायक आगारव्यवस्थापक रोहिणी पाटील व श्री. लांबोर यांना याबाबत जाब विचारला. तसेच गितेश कडू, अनंत पाटकर यांनी कणकवली एसटी विभाग नियंत्रक कार्यालयात भेट देऊन विभागीय वाहतूक अधिकारी श्री. पाटील यांना विचारणा केली. यावर श्री. पाटील यांनी कुडाळच्या आगारव्यवस्थापकांना जोपर्यंत स्मार्टकार्ड उपलब्ध होत नाही तोपर्यंत कागदी पास देण्याची सूचना केली. त्यानुसार कुडाळ आगारात विद्यार्थ्यांना कागदी पास देण्यास सुरवात झाली आहे.
विद्यार्थ्यांनी स्मार्टकार्डसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात नोंदणी केली होती. मात्र स्मार्टकार्ड उपलब्ध नसल्याने आता कागदी पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे ज्यांनी स्मार्टकार्डसाठी नोंदणी केल्या त्या विद्यार्थ्यांना आता घाबरण्याची गरज नाही. कागदी पासची मुदत संपल्यावर जेव्हा स्मार्टकार्ड उपलब्ध होईल त्या तारखेपासून पुढील महिनाभरासाठी नोंदणी करताना भरलेल्या पैशामध्ये वापरण्याची मुभा असणार आहे. यामुळे भरलेले पैसे फुकट जाण्याची विद्यार्थ्यांच्या मनातील भीती युवासेनेने दूर केली आहे. तसेच या कागदी पासच्या ओळखपत्रासाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा स्मार्टकार्डच्या नोंदणीची प्रिंट वापरा अशा सूचना युवासेनेने विभाग नियंत्रकांना केल्या. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ओळखपत्रासाठी वेगळे पैसे न भरता आवश्यक कागदपत्रांचा अवलंब करावा असे आवाहन युवासेनेच्यावतीने करण्यात आले आहे.