छोट्या इमारतींचा टाईप प्लान करावा : सभेत सभापती देसाई यांचे आदेश
सिंधुदुर्गनगरी, ता. २० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशु दवाखान्यांच्या इमारती मोठ्या आहेत. मात्र देखभालीसाठी कर्मचारी वर्ग नाही. परिणामी हे दवाखाने नादुरुस्त होतात. त्यांची पुन्हा दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे या पशु दवाखान्यांच्या इमारती म्हणजे पांढरा हत्ती पोसन्यासारखे आहे. त्यामुळे यापुढे नविन पशु दवाखाने बांधताना लहान दवाखाने बांधण्यात यावे असा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला आहे. तसेच लहान इमारतीचे टाईप प्लान आणि त्याचे अंदाजपत्रक बांधकाम विभागकडूज करून घेण्यात यावे, असे आदेश जिप उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी सभेत दिले.
जिप पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात जिप उपाध्यक्ष तथा सभापती रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, समिती सदस्य सावी लोके, मनस्वी घारे, श्वेता कोरगावकर, सोनाली कोदे, सुजाता हळदिवे, तालुका पशुधन अधिकारी, खातेप्रमुख आदि उपस्थित होते.
चांदा ते बांदा योजनेंतर्गत सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी कुक्कुट पिलांचे वाटप करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत याबाबत वस्तुस्थिति काय आहे अशी माहिती उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी सभेत मागितली. यावर सावंतवाडी पशुधन अधिकारी यांनी कुक्कुट पिल्लांचे वाटप झाल्याचे आपल्यालाही वृत्त पत्रातून कळाले आहे. मात्र आपल्याला याबाबत परिपूर्ण माहिती नाही. कारण चांदा ते बांदा ही योजना तीन स्तरावरून राबविण्यात येत आहे. एक कक्ष स्तर, दोन पशु उपायुक्त आणि तीन पशुधन अधिकारी परंतू आपल्याकडे केवळ अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी असल्याचे पशुधन अधिकारी यांनी स्पष्ट केले. यावर पुढील सभेत उपायुक्त यांना याबाबत माहिती घेवून उपस्थित राहण्याबाबत कल्पना देण्यात यावी अशी सुचना सभापती देसाई यांनी केली.
रिक्त पदे भरण्याकडे शासनाचा दुर्लक्ष
पशुसंवर्धन विभागातील पशुधन अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत २ कर्मचारी बदलीने अन्य जिल्ह्यात गेले आहेत. मात्र त्या बदली प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकही कर्मचारी मिळाला नसल्याची माहिती सभेत देण्यात आली. यावर जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे आणि येथील कर्मचाऱ्यांच्या बदलींवर भर देत असल्याने याबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर आगामी भरतीत प्रधान्याने जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.