जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रे सदोषकृषि समिती सभेत आरोप…

2

सिंधुदुर्गनगरी ता.२०:
अचानक वाढलेल्या तापमानामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान झाले. मात्र, हवामान केंद्रात वाढीव तापमानाची नोंद नसल्याने संबधित शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाईचा लाभ मिळाला नाही असे सांगत जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रे सदोष असल्याचा आरोप सदस्य सुधीर नकाशे यांनी केला. या आरोपाला जिप उपाध्यक्ष देसाई यांनी सहमती दर्शवत या हवामान केंद्राचा सद्यस्थितिचा अहवाल पुढील सभेत सादर करावा आणि हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांना पुढील सभेत हजर राहण्यास सांगा अशी सुचना केली.
जिप कृषी समितीची तहकूब सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात जिप उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, समिती सदस्य प्रितेश राऊळ, महेंद्र चव्हाण, संजय देसाई, सुधीर नकाशे, तालुका कृषी अधिकारी, खातेप्रमुख आदि उपस्थित होते.
एप्रिल-मे महिन्यात तापमान वाढल्याने अनेक आंबा व काजू बागायतींमधील फळ पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. मात्र स्वयंचलित हवामान केंद्राचा अहवाल तापमान वाढीचा नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बागायतदारांना पिक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाई मिळालेली नाही. मुळात जिल्ह्यात वाढीव तापमान असताना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे ही स्वयंचलित हवामान केंद्रे सदोष असल्याचा आरोप सदस्य सुधीर नकाशे यांनी सभेत केला. याबाबत विचारणा केली असता स्वयंचलित हवामान केंद्राचा तापमानाचा अहवाल हा थेट हवामान संस्थेकडे जातो आणि तेथून शासनाला जातो. ३५ अंश सेल्शिअम पेक्षा जास्त तापमान असले तरच नुकसान भरपाई दिली जात असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर अन्य तापमान यंत्रात जिल्ह्यात ३८ ते ४० अंश सेल्शिअम तापमान दाखवत असतानाही या हवामान केंद्राचे तापमान हे ३५ अंश सेल्शिअम एवढेच दाखवते. याचाच अर्थ ही हवामान केंद्रे सदोष असल्याचे आढळून येत असल्याचे रणजीत देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या हवामान केंद्राचा सद्यस्थितिच अहवाल पुढील सभेत सादर करावा आणि हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांना पुढील सभेत हजर राहण्यास सांगा अशी सुचना सभेत रणजीत देसाई यांनी केली.
जिल्ह्यात ८० टक्के भात पेरणी व लावणी पूर्ण होऊन अद्यापही राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणारी यांत्रिकी अवजारे अद्याप प्राप्त नाही. जिल्ह्यातील चार हजार ३९२ शेतकऱ्याने यांत्रिकी अवजारासाठी अर्ज करून त्यांना अवजारे न मिळाल्यामुळे शेतकरी शेती कधी करणार? ती देण्यास दिरंगाई करून शेतकऱ्यांचा अंत पाहू नका वेळ पडल्यास आम्हाला भजन आंदोलना सारखे आंदोलन करावे लागेल असा इशाराही सदस्य महेंद्र चव्हाण यांनी सभेत दिला.
चांदा ते बांदा या योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप झाले. त्यासाठी मिळालेल्या अनुदानातून यांत्रिकी अवजारे पुरविण्यात आली; परंतु कृषी यांत्रिकी साठी २३ लाख ९६ हजार अनुदान प्राप्त असून ४ हजार ३९२ अर्ज प्राप्त आहेत. पुरेसे अनुदान उपलब्ध होताच याबाबतची ही कारवाई केली जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

13

4