जुनी पेंशन हक्क संघटनेचे ३ ऑगस्टला धरणे आंदोलन

149
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी  ता.२०
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील डीसीपीएस धारक प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून त्या सोडविण्याकडे जिप प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने केला आहे. तसेच प्रलंबित मागण्यांकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा ईशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील डीसीपीएस धारक प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी होत असलेला विलंब, सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता रोखीने अदा करण्यास झालेला विलंब, पदवीधर पदोन्नतीमध्ये बारावी शास्त्र तसेच विज्ञान-गणित विषयासह बी.एड. उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना विना अट सामावून घेण्याबाबत होत असलेला विलंब याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिप प्राथमिक शिक्षण विभागाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. प्रसंगी आंदोलनेही करण्यात आली. मात्र संबंधित समस्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसा ईशाराही जिप मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

\