उभादांडा-मुठ येथील पन्नास घरांना धोका…?

2

धूपप्रतिबंधक बंधारा खराब झाल्यामुळे परिस्थिती : शिवसेनेकडून पाहणी

वेंगुर्ले, ता.२० : वेंगुर्ले उभादांडा मूठ येथील धुपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या लाटांमुळे तुटून नुकसान झाले आहे. याबाबत आज शनिवारी शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी व अन्य पदाधिकारी यांनी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांसह बंधाऱ्यांची पाहणी केली. कारण उभादांडा मूठ केपादेवी मंदिर नजीकच्या सुमारे ५० घरांना धोका निर्माण झाला आहे.
किनारपट्टीवरील नागरीकांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून हे धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात आले होते. मात्र मूठ येथील बंधारा समुद्राच्या लाटांमुळे खराब झाल्याने लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी शिवसेना शाखेशी संपर्क केल्यावर तात्काळ तालुकाप्रमुख बाळा दळवी, संजय गावडे, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, उमेश नाईक आदींसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी पत्तनचे सहाययक स्थापत्य अभियंता ज्ञानेश्वर वाघमारे, कनिष्ठ अभियंता योगेश कंगणकर यांना बोलावून घेत संबंधीत बंधाऱ्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी नितीश कुडतरकर, रमाकांत गिरप, अभिमन्यू भुते, आल्मेडा, श्रद्धा कुडाळकर, आनंद गिरप, राजेश गिरप, प्रविण गिरप, प्रभाकर देवली, मिलन केळुसकर, लल्लू गिरप, जिजी तांडेल, रुपेश आरावंदेकर, बाळा गिरप, सागररक्षक संकेत तोरसकर, वासुदेव देवजी आदी उपस्थित होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. बाळा दळवी यांनी याबाबत येथील भागातील नागरिकांशी बोलताना आपल्या हितासाठी बंधारा दुरुस्ती – डागडुजीसाठी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुराव्यासाठी प्रयत्न केले जातील ,असे सांगितले.

2

4