यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा २८ जुलैला पदवी प्रदान कार्यक्रम…

200
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विभागीय संचालक प्रा. दादासाहेब मोरे यांची माहिती ; १८५० जणांना पदवी प्रदान होणार…

मालवण, ता. २० : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आणि पदव्युत्तर पदवी, पदवी पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा २८ जुलैला सकाळी साडे अकरा वाजता स. का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे होणार आहे. या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात १८५० विद्यार्थांना प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती मुक्त विद्यापीठचे विभागीय संचालक प्रा. दादासाहेब मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, प्रा. देविदास हारगिले आदी उपस्थित होते.
श्री. मोरे म्हणाले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ दरवर्षी नाशिक येथील मुख्यालयात पदवीदान समारंभ आयोजित करते. या समारंभात विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविकांचे वितरण केले जाते. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र राज्य असल्याने या पदवीदान समारंभासाठी उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे अशक्य असते. अनेक अडी-अडचणींना सामोरे जात मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना नाशिक येथे जाऊन पदवी प्रमाणपत्र घेणे आर्थिक व वेळेच्या दृष्टीने देखील शक्य होत नाही. याचा विचार करुन कोल्हापूर विभागीय केंद्राने गेल्या वर्षापासून या विभागाच्या कार्यकक्षेतील चारही जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्यातील विविध शिक्षणक्रमांच्या अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे, त्यांना सन्मानाने पदवी प्रदान करावी. त्यातून शिकणाऱ्यांची उमेद वाढावी असा उद्देश या कार्यक्रमामागील आहे.
राज्यातील असा पहिलाच पदवी प्रमाणपत्र वितरणाचा उपक्रम कोल्हापूर विभागीय केंद्राच्यावतीने राबविण्यात आला. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसादही मिळाला. त्यामुळे मुक्त विद्यापीठाने राज्यातील सर्व आठ विभागीय केंद्रांना या वर्षापासून जिल्हापातळीवर असे पदवी प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम घेण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर राज्यातील पारंपरिक विद्यापीठानेदेखील आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयातून पदवी प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम सुरु केले आहेत. असा दिशादर्शक उपक्रम या विभागीय केंद्रामार्फत राबवित असल्याचा अभिमान या विभागीय केंद्राला आहे, असेही श्री. मोरे यावेळी म्हणाले.

\