वैकुंठभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची उद्यापासून दुरुस्ती…

2

बांधकाम सभापती गणेश कुशे यांनी केले स्पष्ट ; पावसाळ्यानंतर रस्त्याची उंची वाढविणार…

मालवण, ता. २० : शहरातील देऊळवाडा- आडवण येथील स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने आज नगरपरिषदेचे बांधकाम सभापती गणेश कुशे यांनी या रस्त्याची पाहणी केली. उद्यापासून या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरवात करणार असून पावसाळ्यानंतर या रस्त्याची उंची वाढवून डांबरीकरण केले जाईल असे श्री. कुशे यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजा केरिपाळे आदी उपस्थित होते. शहरातील आडवण भागात नगरपरिषदेच्यावतीने स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. देऊळवाडा येथील मुख्य रस्त्यावरून आडवण वायरी येथे जाणार्‍या रस्त्यावरच ही स्मशानभूमी आहे. मात्र स्मशानभूमीकडे जाणार्‍या या रस्त्याची गेल्या काही वर्षात दुरवस्था झाली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचार्‍यांना, वाहनचालकांना ये-जा करणे मुश्किल बनले आहे. पावसामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून रस्ता चिखलमय झाला आहे.
एखादी व्यक्ती मृत्यु पावल्यास त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी दिवसा किंवा रात्रीच्या वेळेस स्मशानभूमीत नेताना समस्या भासत असल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या पार्श्‍वभूमीवर आज नगरपरिषदेचे बांधकाम सभापती श्री. कुशे यांनी या रस्त्याची पाहणी करत उद्यापासून या रस्त्याची डागडुजी केली जाईल असे सांगितले.

1

4