स्वच्छ सर्वेक्षण अभियान:पालिका पदाधिकाऱ्यांत नाराजी,संपूर्ण बक्षीस देण्याची मागणी…
सावंतवाडी ता.२१: केंद्र व राज्य शासनाकडून नगरपालिकांना स्वच्छ सर्वेक्षण या कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारी बक्षिसाची रक्कम ३० टक्के इतकीच वाटप केली जाणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे नगरपालिका पदाधिकाऱ्यांत नाराजी असून शासनाकडून जाहीर करण्यात आलेली बक्षीसाची सर्व रक्कम देण्यात यावी अशी मागणी पालिका पदाधिका-यांकडुन होत आहे.त्यामुळे होणार्या कार्यक्रमाला जाण्याबाबत नगरसेवकातून अनास्था आहे.
स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.या मोहिमेअंतर्गत चांगले काम करणाऱ्या नगरपालिकांना कोटीची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.मात्र बक्षिसे जाहीर झाल्यानंतर तीन वर्षे उलटली तरी ही बक्षिसे अद्यापर्यंत शासनाकडून वाटप करण्यात आली नाहीत,त्यामुळे याबाबत नाराजी होती.
याचे पडसाद सावंतवाडी शहरात उमटले होते.अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी ही बक्षीस मिळावीत यासाठी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.या आंदोलनाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विरोधी नगरसेवकांनी आपला पाठिंबा दर्शवला होता.तर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपण तुमच्यासोबत असल्याचे भेट घेवून जाहीर केले होते.दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन २३ तारखेला शासनाकडून घाईगडबडीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.हा कार्यक्रम मुंबई येथे होत आहे.त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.परंतु त्या वेळी देण्यात येणारी रक्कम बक्षिसाच्या तीस टक्के इतकी देण्यात येणार असल्याचे संबंधित नगरपालिकांना कळविण्यात आले आहे.त्यामुळे शासनाच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त होत असून बक्षिसाची रक्कम सर्वच्या सर्व देण्यात यावी अशी मागणी होत आहे.