अर्चना फाऊंडेशन कडुन धाको-यात नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर

230
2

सावंतवाडी ता 21
येथील अर्चना फाऊंडेशन व धाकोरे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि सामान्य आरोग्याची तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांना आरोग्यविषयक सल्ला, औषधे व चष्म्याचे वाटप करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्चना फाऊंडेशन मार्फत आयोजन करण्यात आले होते त्याचाच भाग म्हणून येथील गावकऱ्यांसाठी आज आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी अर्चना घारे परब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ग्रामीण भागात अजूनही आरोग्याला प्राथमिकता दिली जात नाही किंबहुना तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्षच केलं जातं. त्याने आजार अधिक गंभीर बनत जातात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य फार पटकन खालावत चाललंय. असं असतांना त्याची योग्यवेळी तपासणी केली नाही तर ते बळावत जातात. आजाराचं योग्यवेळी निदान करून घेतलं पाहिजे, औषधोपचार केले पाहिजे. शक्यतो आजारीच पडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे परंतु आपण आजारी पडल्यावर बघू म्हणून गोष्टी टाळत जातो. शरीराबरोबर मनावरही कायम ताण पडत असतो त्याचंही वेळीच नियोजन केले पाहिजे. मानसिक आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. डोळ्यांच्या बाबतीतही तसंच.
डोळ्यांची नीट काळजी घेतली जात नाही. डोळ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष्य केलं जातं त्यामुळे डोळ्यांचे गंभीर आजार उद्भवतात. लक्ष न दिल्याने मोतीबिंदू आणि काचबिंदू होतात. वेळीच तपासणी न केल्याने नंबर लागला आहे की नाही ते कळत नाही आणि त्यामुळे डोकेदुखी, डोळे लाल होणे, पाणी येणे, नजर कमजोर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा तक्रारींची वेळीच दखल घेतली पाहिजे असे त्या यावेळी म्हणाल्या. डॉ.लिंगावत यांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून शरीर आणि मनाची कशी निगा राखली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं. या शिबिरासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.लिंगावत, अजित नातू, मुळीक, गावचे उपसरपंच पार्सेकर आणि गावकरी उपस्थित होते.

4