प्रवाशांचे अतोनात हाल; उपाययोजना करण्याची मागणी
वैभववाडी/पंकज मोरे ता.२१:तालुक्यात अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे वैभववाडी बसस्थानक परिसरात पाणी साचले असून प्रचंड दलदल, चिखल निर्माण झाला आहे. चिखलातून एस.टी. बसमध्ये चढताना प्रवाशांचे हाल होत असून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
वैभववाडी बसस्थानकातून दिवसभर बसेसची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र सध्या या बसस्थानक परिसराला चिखल व खड्यांचे ग्रहण लागले आहे. स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. अधूनमधून कोसळणा-या पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरले आहेत.
गर्दीने गजबजलेल्या बसस्थानकात कसरत करून बसमध्ये चढावे लागत आहे. त्याचवेळी बस आल्यावर चिखलाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. बसस्थानक परिसरात डांबरीकर न झाल्याने खड्डे व मोठ्या प्रमाणात दलदल झाली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात सगळीकडे चिखलच चिखल झालेला आहे. यातूनच प्रवाशांना एस.टी. मध्ये चढावे लागत आहे.
एस. टी. येताना जाताना उडणारा चिखल प्रवाशांचे कपडे खराब करत आहे. शालेय मुलांचे युनिफॉर्म खराब होत आहेत. चिखलात पाय घसरून अपघात होण्याची दाट संभवना आहे. वृद्ध व महिला प्रवाशांचे चिखलातून चालताना हाल होत आहेत. एवढा चिखलाचा राडा होवूनही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेवूनच असल्याचे चित्र दिसत आहे.