जिल्ह्यातही विविध उपक्रम
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चा ५८ वा स्थापनादिन सोमवार दि.२२ जुलै रोजी विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार असून मुख्यत्वेकरून हा दिवस जुनी पेन्शन हक्क मागणी दिन म्हणून पाळला जाणार आहे. तसेच स्थापनादिनी संघटनेचे संस्थापक कै. भा.वा.शिंपी गुरुजी यांची प्रतिमापूजन,वृक्षारोपण,रक्तदान शिबिर करण्याचे नियोजनही शिक्षक समितीने राज्यभर केले आहे.
गेल्या वर्षीपासून शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे व राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांचे संकल्पनेतून हा दिवस जुनी पेन्शन हक्क दिन म्हणून पाळण्यात येत असून सर्व डिसीपीएस धारक शिक्षकांना जुनी पेन्शन मिळे पर्यंत हा संघर्ष ज्वलंत ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात याअंतर्गत शिक्षक समितीच्या सर्व तालुका शाखा तहसीलदार मार्फत पंतप्रधान महोदय, भारत सरकार आणि मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करतील. तर
जिल्हास्तरावर २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन सायं.५वा.सादर केले जाईल.तद्नंतर सायं.६वा.शिक्षक पतपेढी येथे संस्थापक कै. भा.वा.शिंपी यांचे प्रतिमापूजन तसेच वृक्षारोपण करण्यात येईल.
सदर कार्यक्रमास शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे व जिल्हासरचिटणीस
चंद्रसेन पाताडे यांनी केले आहे.