अनुसूचित जाती आयोगाचे माजी सदस्य विद्याभुषण डॉ. प्रशांत पगारे २ आँगस्ट रोजी घेणार अरुणा प्रकल्पग्रस्तांची भेट

2

वैभववाडी, ता. २१ : अरुणा धरण प्रकल्प ग्रस्तांची घरे सध्या पाण्यात आहेत. त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते बेघर झाले आहेत. या प्रकल्प ग्रस्तांवर झालेल्या अन्यायाची दखल घेत भारतीय संविधान राष्ट्र विकास अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती आयोगाचे माजी सदस्य विद्याभुषण डाँ. प्रशांत पगारे २ आँगस्ट रोजी अरुणा धरण प्रकल्पाला भेट देणार असून धरणाच्या पाण्यात घरे बुडुन बेघर झालेल्या आखवणे, नागपवाडी, भोम गावच्या प्रकल्प ग्रस्तांची भेट घेवून या बाबत चर्चा करणार आहेत.
मोबदला नाही, भुखंड नाही, पुनर्वसनाचा पत्ता नाही. पत्राशेड मध्ये राहायला आम्ही जनावरे नाहीत अशी भुमिका घेत आखवणे, नागपवाडी, भोम गावच्या सुमारे ३५० पेक्षा जादा कुटुंबानी आपली घरे न काढता गावातच ठाण मांडून होती. या प्रकल्प ग्रस्तांची राहती घरे ७ ते १० जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्प अधिका-यांनी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात धरणात पाणी साठा केल्याने प्रकल्प ग्रस्तांची घरे पाण्याखाली गेली. या घरांमध्ये भारतीय संविधान राष्ट्र विकास अभियानचे मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांची ही राहती दोन घरे पाण्याखाली गेली आहेत.
या घटनेला दहा बारा दिवस झाले तरी बेघर झालेल्या प्रकल्प ग्रस्तांची प्रशासकीय यंत्रणेने साधी चौकशी केलेली नाही. या पार्श्वभूमीवर अरुणा प्रकल्पाची पहाणी करुन आखवणे, नागपवाडी, भोम गावच्या बेघर झालेल्या प्रकल्प ग्रस्तांची भेट घेवून विद्याभुषण डाँ प्रशांत पगारे प्रकल्प ग्रस्तांशी चर्चा करणार आहेत. त्या नंतर न झालेल्या पुनर्वसन गावठाणांची ते पहाणी करणार असून अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या पाण्यात बेघर झालेल्या प्रकल्प ग्रस्तांच्या शिष्टमंडळासह विद्याभुषण डाँ प्रशांत पगारे सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेवून प्रकल्प ग्रस्तांच्या नुकसानभरपाई आणि पुनर्वसना बाबत चर्चा करणार आहेत.
विद्याभुषण डाँ. प्रशांत पगारे यांच्या समवेत या दौ-यात भारतीय संविधान राष्ट्र विकास अभियानचे राज्य अध्यक्ष डाँ. अशोकराव शिलवंत ,उपाध्यक्ष सयाजीराव उघडे, प्रकाश जाधव, संजयभाऊ खंडागळे राजु गमरे, अंकुश हिवाळे, जी. एस पाईकराव, सिध्दार्थ म्हस्के, प्रकाश दाहीजे, अभयभाऊ पवार, सचित म्हात्रे, जयंत म्हस्के, सुनिल जाधव, सुनिल सरोदे आदी मांन्यवर सहभागी होणार आहेत.
विद्याभुषण डाँ प्रशांत पगारे शनिवारी कोल्हापुर दौ-यावर असतांना भारतीय संविधान राष्ट्र विकास अभियान चे मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे ,प्रकल्प ग्रस्त अजय नागप, प्रकाश सावंत यांनी भेट घेवून त्यांनी अरूणा प्रकल्पास भेट देवून प्रकल्प ग्रस्तांची भेट घेण्याची विनंती केली होती त्या अनुषंगाने डाँ प्रशांत पगारे सिंधुदुर्ग दौ-यावर येणार असल्याची माहिती विद्याभुषण डाँ प्रशांत पगारे यांचे प्रसिद्धी आणि जनसंपर्क प्रमुख अंकुशराव हिवाळे यांनी दिली आहे.

11

4