समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…
सावंतवाडी, ता.२१: वैश्यवाणी समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न आचारसंहितेपूर्वी मार्गी लावू.प्रसंगी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन,असे आश्वासन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिले.येथील वैश्य भवनात समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यादरम्यान समाजबांधवांच्यावतीने या संदर्भात श्री.केसरकर यांना निवेदन दिले.या प्रसंगी माजी आमदार तथा भाजपा सरचिटणीस राजन तेली उपस्थित होते.
ते म्हणाले, वैश्य समाज पिढ्यानपिढ्या व्यापार क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे.ती परंपरा समाजातील युवकांनी कायम ठेवणे गरजेेचे आहे.मात्र नुसता वडिलोपार्जित व्यवसाय न करता त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे.तसे झाल्यास युवापिढीला नोकरी-धंद्यासाठी दुसर्यावर अवलंबून रहावे लागणार नाही व चांगली समृद्धीसुद्धा मिळवता येईल.यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनांचा लाभ त्यांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले.यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,नगरसेविका शुभांगी सुकी,आनंद नेवगी,रमेश बोंद्रे,बाळा बोर्डेकर,ऍड.दीपक नेवगी,चंद्रकांत शिरोडकर,सागर खानोलकर,समृद्धी विर्नोडकर,पुष्पलता कोरगावकर, सुरेंद्र बांदेकर,कीर्ती बोंद्रे,श्वेता शिरोडकर,साक्षी वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.