ज्ञान, कौशल्याच्या आधारावर उत्तुंग भरारी घेत समाजाचे नाव उज्ज्वल करा… रमेश पिंगुळकर ; देवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ…

2

मालवण, ता. २२ : देवळी जात ही बुद्धिवंतांची जात आहे. देवळी समाजातील व्यक्तींनी आज कला, नाट्य, पत्रकारिता, शासकीय अशा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. आपण देवळी समाजातील असल्याची लाज बाळगण्याची गरज नाही. देवळी समाजातील मुलांनी आपले ज्ञान, कौशल्य याच्या आधारावर उत्तुंग भरारी घेत समाजाचे नाव उज्ज्वल करावे. समाज नेहमी तुमच्या पाठीशी असून स्वतः पुढे जाताना समाजालाही पुढे न्यावे असे प्रतिपादन देवळी समाज संघटनेचे नेते आणि माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर यांनी येथे केले.
येथील जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ शाखेच्या वतीने देवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वायरी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झाला. व्यासपीठावर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मारुती आचरेकर, सदानंद तुळसकर, गणपत नाईक, श्री. बांदिवडेकर, रमेश चौकेकर, प्रफुल्ल देसाई, देविदास वेरलकर, उमेश श्रावणकर, दादा परुळेकर, पूजा वेरलकर, सुदेश मालवणकर, बाबल नांदोसकर, दयानंद पाटकर, दादा परुळेकर, पत्रकार अनिल तोंडवळकर, विपुल माळगावकर, प्रणाली मसुरकर, सौ. आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी तसेच इतर स्पर्धा परीक्षा, क्रीडा क्षेत्रात यश मिळविलेल्या गुणवंतांचा प्रमाणपत्र व वह्या देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांचाही यावेळी सत्कार झाला.
प्रास्ताविकात श्री. तळवडेकर यांनी देवळी समाजाच्या विविध कार्यक्रमातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र यायला हवे. समाजातील एकी अधिक बळकट करून समाजाच्या कल्याणासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी श्री. पिंगुळकर म्हणाले, व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने मोठी होते. भविष्यकाळ कठीण असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास व आपले काम करताना त्यात स्वतःला झोकून दिल्यास यश मिळेल. काम केल्याशिवाय मान मिळत नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखा, स्वतःमधील कौशल्यावर अधिक प्रभुत्व मिळवा. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात करिअर करावे. तसेच अभ्यासाबरोबरच संस्कारही जोपसावेत असे सांगितले.
यावेळी गणपत नाईक यांनी देवळी समाज बांधवांनी सर्वांच्या सहकार्यातून समाजातील गरजूंना मदत करायला हवी असे सांगितले. सूत्रसंचालन मारुती आचरेकर यांनी केले. यावेळी तालुक्यातील देवळी समाजातील बांधव, भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

24

4