इतिहासात प्रथमच सिंधुदुर्गला संधी
सहा जिल्ह्यांचे करणार प्रतिनिधित्व
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत येथील जेष्ठ व प्रतिष्ठित वकील संग्राम देसाई यांची निवड झाली आहे. मार्च 2018 पासून ही निवडणूक प्रक्रिया सुरु होती. सोमवारी या निवडणुकीचा निकाल लागला. सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी वकील संग्राम देसाई यांनी निवडणूक लढविली होती. कोल्हापुर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून ही निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच वकील संग्राम देसाई यांच्या रूपाने महाराष्ट्र गोवा बार कौंसिलवर संचालक म्हणून निवड झाली आहे. याबाबत वकील देसाई यांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बार काॅन्सील ऑफ गोवा , महाराष्ट्र ची पंचवार्षिक निवडणुक मार्च 2018 मध्ये सुरु झाली होती. 25 सदस्य पदांसाठी झालेल्या या निवडणुकीसाठी आत्तापर्यत सिंधुदुर्गातून कोणीही निवडून रिंगणात उतरला नव्हता. मात्र, यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सिंधुदुर्गातून उमेदवार देण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनने घेतला. त्यानुसार वकील संग्राम देसाई यांना पाठिंबा देत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बार कौन्सिलचे एकूण 1 लाख 23 हजार एवढे मतदार आहेत. या निवडणुकीतून 25 उमेदवार निवडले जातात. ही निवडणूक आतापर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही उमेद्वाराने लढविलेली नव्हती. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथील उमेदवार देण्याचा व निवडणुक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सर्वानुमते संग्राम देसाई यांना उमेदवारी निश्चित करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा बार असोशिएशनने घेतला होता. वकील देसाई यांच्या विजयासाठी सिंधुदुर्ग बार असोसिएशनने प्रचंड मेहनत घेतली आहे.