जानवलीत किसान दिनानिमित्त शेतकरी मेळावा : 53 लाखांच्या कर्जाचे वितरण
कणकवली, ता.22 ः शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे. या शेतकर्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया विविध योजना राबवत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकर्यांनी आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन कृषी उपविभागीय अधिकारी डॉ.चांगदेव बागल यांनी केले.
जानवली ग्रामपंचायत सभागृहात बँक ऑफ इंडियाच्या आणि कृषी बँकिंग केंद्राच्यावतीने किसान दिनाच्या औचित्यावर शेतकरी मेळावा झाला. यात डॉ.बागल यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच आर्या राणे, मुख्य प्रबंधक प्रदीप प्रामाणिक, जिल्हा अग्रणी प्रबंधक अरुण कुमार, विस्तार अधिकारी आर मेस्त्री, कृषी अधिकारी श्री.तोरणे, मुख्य प्रबंधक विश्वमित्र नाग, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक के. बी जाधव, ग्रामसेवक अर्चना लाड, ओरोस शाखा व्यवस्थापक श्री.मालवणकर, तळेरे शाखा व्यवस्थापक श्री. शाह, नांदगाव शाखा व्यवस्थापक श्री. पांडे, सांगवे शाखा व्यवस्थापक श्री. तडफदार, वैभववाडी शाखा व्यवस्थापक श्री कुंकडे यासह विविध बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी उपस्थित होते
सरपंच आर्या राणे म्हणाल्या, शेतकर्यांनी बँकांच्या सहकार्याने विविध फळ बागायती, फुल बागायती व अन्य प्रकारच्या शेती करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. बँक ऑफ इंडिया व अन्य बँका शेतकर्यांना आर्थिक समृध्द करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवीत आहेत. त्याचाही लाभ शेतकर्यांनी घेतल्यास निश्चितच प्रगती होईल. वरिष्ठ व्यवस्थापक के. बी जाधव म्हणाले, जिल्ह्याची लीड बँक बँक ऑफ इंडिया आहे. आज किसान दिनाचे औचित्य साधून शेतकर्यांना 53 लाखांचे कर्ज वितरण करत आहोत. त्यामध्ये कणकवली शाखा 31 लाख, ओरोस शाखा 10 लाख, मालवण शाखा 5.20 लाख, तळेरे शाखा 3.20 लाख, सांगवे शाखा 3.30 लाख, वैभववाडी शाखा 2.30 लाख एकूण 53 लाखांचे वितरण आम्ही करत आहोत. शेतकर्यांनी पंतप्रधान सुकन्या समृध्दी योजना व शेती विषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम अडळ यांनी केले