अखेर वैकुंठभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीस प्रारंभ प्रशासनास दहा दिवसांपूर्वीच आदेश दिला होता ; नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केले स्पष्ट

2

मालवण, ता. २२ : शहरातील देऊळवाडा-आडवण स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश आपण दहा दिवसांपूर्वीच प्रशासनास दिले होते. मात्र त्याची कार्यवाही प्रशासनाकडून न झाल्यानेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती, उपनगराध्यक्षांनी पाहणी करत तत्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश प्रशासनास दिले. त्यानुसार आजपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
शहरातील देऊळवाडा आडवण स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने रस्ता चिखलमय झाला असून सर्वसामान्यांबरोबरच वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. स्मशानभूमीत एखादे पार्थिव न्यायचे झाल्यास हाल होत असल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेच्या दुर्लक्षाबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती गणेश कुशे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ दुरुस्तीचे काम केले जाईल असे स्पष्ट केले होते.
आडवण स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने दहा दिवसांपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. मात्र त्यांनी आवश्यक कार्यवाही केली नाही. मात्र पुन्हा प्रशासनास तत्काळ हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार सकाळपासूनच रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

19

4