पोस्ट कार्यालयानजीकची घटना ; भरवस्तीतील प्रकारामुळे उडाली खळबळ…
मालवण, ता. २२ : शहरातील पोस्ट कार्यालयालगत राहणार्या आबा खोत यांच्या घरात मध्यरात्री एका अज्ञात चोरट्याने घुसून चोरीचा प्रयत्न केला. मात्र घरातील मंडळींनी ओरड मारताच त्या चोरट्याने तेथून पळ काढला. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली नव्हती.
येथील पोस्ट कार्यालयासमोरच आबा खोत यांचे घर आहे. घरातील सर्वजण रात्री झोपी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने घराच्या बाहेरील लाईटचा फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर घरात प्रवेश करत आत सुरू असलेला रॉकेलचा दिवाही विझविला. घरात चोरीचा प्रयत्न करत असता झोपलेल्या काहींना जाग आली. घरात चोरटा घुसल्याचे कळताच त्यांनी ओरड मारली. यात काळोखाचा फायदा घेत त्या चोरट्याने पळ काढला. खोत यांचे घर भरवस्तीत आहे. त्यामुळे चोर घरात शिरल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.