कणकवली पर्यटन महोत्सवाचा शानदार शुभारंभ

2

विविध प्रभागातून आकर्षक देखावे : ढोल ताशांच्या गजरात शहरातून शोभायात्रा

कणकवली, ता.५ ः जिल्ह्याची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्‍या कणकवली शहरातील पर्यटन महोत्‍सवाला आज शानदार प्रारंभ झाला.
विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्यजत्रेचा अनोखा मिलाफ असलेल्या कणकवली पर्यटन महोत्सवाच्या प्रारंभी शहरातील १७ प्रभागातून भव्य चित्ररथ, देखावे काढण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात पटकीदेवी मंदिर ते बाजारपेठ तेथून पटवर्धन चौक मार्गे उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पर्यटन महोत्‍सव स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.
सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसह
ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरील देखाव्यांनी शोभायात्रेचे लक्ष वेधून घेतले होते. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर यांच्यासह ॲड.विराज भोसले, रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, अभिजित मुसळे, शिशिर परुळेकर, सुप्रिया नलावडे, कविता राणे, उर्मी जाधव आदी नगरसेवकांसह शहरातील प्रतिष्‍ठित नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
शहराच्या १७ प्रभागातून पटकीदेवी मंदिर येथे सायंकाळी साडे पाच वाजता सर्व चित्ररथ आणण्यात आले. तेथून बाजारपेठ मार्गे शोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या प्रारंभी सिंधुगर्जना महिला ढोलपथकाने ढोलताशांचा गजर केला होता. त्‍यापाठोपाठ गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष साजरा करण्याचा संदेश नेहरूनगरच्या देखाव्याने केला. यानंतर शहराच्या विविध प्रभागातून पंढरपूरची वारी, मत्स्य रूपातील विष्णू अवतार, पंढरपूरचा विठोबा, श्रीकृष्णाचे विराट रूप, स्वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव, भगीरथाची गंगा, तुकोबारायांचे सदेह वैकुंठागमन, पहाटे घराेघरी येणारा वासुदेव आदी विविध देखावे काढण्यात आले होते.
सायंकाळी सात वाजता पर्यटन महोत्‍सवस्थळी शोभायात्रेची सांगता झाली. त्‍यानंतर विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणाऱ्या फुड फेस्टिव्हलचे उद्‌घाटन करण्यात आले.

4