सिंधुदुर्गातील तरूणांचे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्‍न

5
2

रवींद्र चव्हाण : कणकवली पर्यटन महोत्‍सवाचे उद्‌घाटन

कणकवली, ता.५ : केंद्रीय नारायण राणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्‍हा झाला आणि इथल्‍या पर्यटन विकासाला चालना मिळाली. त्‍या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले. आता इथल्‍या तरूणांचे मुंबई व इतर शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे यासाठी प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आम्‍ही त्‍यासाठी कटीबद्ध आहोत अशी ग्‍वाही पालकमंत्री तथा राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.
कणकवली पर्यटन महोत्‍सवाचा प्रारंभ आज उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्‍हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत, रोटरी क्‍लबचे गौरेश धोंड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्‍हणाले की, आगामी काळातही जिल्ह्यातील प्रत्‍येकी व्यक्‍ती सक्षम व्हावा. इथे उद्योजक व्हावेत, शेतकऱ्यांना पूरक उद्योगधंदे करता यावेत. इथल्‍या तरूणांचे स्थलांतर थांबावे यासाठी आम्‍ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून करत आहोत. पर्यटन महोत्‍सवाच्या माध्यमातून इथल्‍या कलांना आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्‍ध झाली आहे. तसेच कला संस्कृती जपली जात आहे. कणकवलीवासीयांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी हा चांगला उपक्रम समीर नलावडे आणि त्‍यांच्या सहकाऱ्यांतून राबवला जात आहे.

मान्यवरांचा सत्‍कार
कोरोना कालावधी आपल्‍या जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अशोक राणे, अरूण जोगळे, उत्तम पुजारे, निनाद पारकर, अमित टकले. डॉ.सुहास पावसकर, शिवाजी परब, डॉ.संजय पोळ, अधिपरिचारिका नयना मुसळे, आरोग्‍य सहाय्यक प्रशांत बुचडे, विशाल मेस्त्री, संविता आश्रमचे संदीप परब आदींचा सत्‍कार यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला.

4