निकृष्ट रस्ता असल्याचा ग्रामस्थांचा आरोप: तात्काळ रस्ता सुरळीत करा अधिकाऱ्यांना सूचना
वेंगुर्ले, ता. २३ : ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चालु असलेल्या पाल-न्हैचिआड रस्त्याच्या निकृष्ट कामाची संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी गावात येऊन ग्रामस्थांसमवेत पाहाणी केली. तसेच ग्रामस्थांसमेवत चर्चा करुन अपुर्ण व निकृष्ट रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत सुस्थितीत करुन देण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पाल-न्हैचिआड रस्त्याच्या कामाबाबत काम सुरु झाल्यापासूनच ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. स्वाभिमान पक्षाचे माजी विभागीय अध्यक्ष कमलेश गावडे यांनी याबाबत आवाज उठवून अनेक वेळा सांगूनही जर असे अधिकारी कामाकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्याबरोबर नेमके कसे वागावे हे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जाहिर करावे असे आवाहन केले होते. तसेच त्यांनी ग्रामस्थांसमेवत कुडाळ येथील श्री. पाटील यांच्या कार्यालयात भेट देऊन त्यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार काल श्री. पाटील यांनी गावात येऊन रस्त्याची पहाणी केली व निकृष्ट काम सुधारुन देण्याबाबत संबंधितांना सुचना दिल्या आहेत. यावेळी सरपंच श्रीकांत मेस्त्री, ग्रा.प.सदस्य विनोद चव्हाण, संयोग पालकर, संध्या गावडे तसेच माजी उपसरपंच राजन नाईक, रामदास परब, पोलिस पाटील रुतिका नाईक त्याचप्रमाणे सुचिता नाईक, दिपक गावडे, विलास गावडे, हरी गावडे, नारायण उर्फ बाळा गावडे, रुचिरा पालकर आदिंंसह ग्रामस्थ उपस्थित होते.