पोलिस पथक सावंतवाडीत दाखल : वीसहून अधिक जणांची कसून चौकशी सुरू
सावंतवाडी / निखील जाधव , ता. २३ : औरंगाबादमध्ये घडलेल्या चारचाकी चोरी प्रकरणात सावंतवाडीतील चौघे तेथील पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी तेथील पोलिस पथक आज सकाळी येथील पोलिस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी तब्बल 20 जणांची चौकशी सुरू आहे.
संबंधित संशयित असलेल्या चोरट्यांनी तेथील बोलेरो पिकअपसारख्या दोन मोठ्या गाड्या चोरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान त्यातील एक गाडी पोलिसांना जप्त करण्यात यश आले आहे. तर दुसरी गाडी जप्त करण्यासाठी तेथील पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता ती कारवाई औरंगाबाद पोलिसांनी केली असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी तब्बल 20 जणांची चौकशी सुरू आहे. त्यातील गाडी चोरणारे, त्यानंतर गाडीचा रंग बदलणारे, गाडी विकणारे आणि गाडी विकत घेणारे अशा अनेकांचा समावेश आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी मात्र गोपनीयता पाळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आंबेगाव, कुणकेरी, कोलगाव आदी भागातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.