वकील मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचे दिले आश्वासन
सिंधुदुर्गनगरी ता.२३; माझा विजय हा माझ्यासाठी व सिंधुदुर्ग बार कौन्सिलच्या वाटचालितील सर्वात आनंदाचा व महत्वाचा क्षण आहे. यासाठी प्रत्येक सदस्याचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. हा एकजुटीचा विजय आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोल्हापुर खंडपीठासाठी माझा प्रयत्न असणारच आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील वकिलांना मार्गदर्शन होण्यासाठी जिल्ह्यात मार्गदर्शन केंद्र सुरु करणार आहे, असे मत महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलवर नवव्या क्रमांकाने निवडून गेलेल्या वकील संग्राम देसाई यांनी मंगळवारी बोलताना व्यक्त केले.
सुमारे दीड वर्ष एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेल्या महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी दिल्ली येथे जाहिर झाला. या निवडणुकीत राज्यात दोन्ही राज्यात मिळून 25 संचालक निवडून द्यायचे होते. सिंधुदुर्ग बार कौन्सिलने यासाठी प्रथमच वकील संग्राम देसाई यांच्या रूपाने उमेदवार उभा केला होता. वकील देसाई हे नऊ क्रमांकाच्या पसंतीच्या मताने विजयी झाले. त्यानिमित्त जिल्हा न्यायालयात असलेल्या बार कौन्सिल कार्यालयात त्यांचा जिल्हा बार कौन्सिल व सर्व वकील यांच्यावतीने सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी जिल्हा सरकारी वकील सूर्यकांत खानोलकर, राजिव बिले, राजेंद्र रावराणे, डी डी नेवगी, संदीप निंबाळकर, मनोज रावराणे, पी एन कुलकर्णी, अमोल सामंत, श्यामराव सावंत, उमेश सावंत, दीपक अंधारी, विवेक मांडकुलकर, शोएब डिंगणकर, सौ गौरी देसाई, श्री पणदूरकर, वीरेश नाईक, अविनाश परब, स्वप्निल सावंत आदि जेष्ठ व अन्य वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा आनंद केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना निवडणूक निमित्ताने आपण बारा जिल्हे फिरलो. हा विजय आपण वडील डी डी देसाई यांना समर्पित करीत आहे. यावेळी जेष्ठ वकिलांनी विचार व्यक्त करताना ‘एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद व्यक्त केला. 512 जिल्ह्याचे सभासद असताना नवव्या क्रमांकाने विजय मिळाला. यात विजयी उमेदवार संग्राम देसाई यांचे उत्कृष्ट नियोजन महत्वाचे ठरले. देसाईच हे शिवधनुष्य पेलू शकले. राज्य बार कौन्सिलवर घरातील माणूस गेल्याने समाधान वाटते. जिल्ह्यात वकिलांची लायब्ररी, लॉकर्स व पतसंस्था सुरु व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.