मालवणातील प्रकार : महावितरणच्या कारभाराने ग्राहक हवालदिल
मालवण, ता. २३ : ज्या ग्राहकाचे वीजबिल दरमहा पाचशे ते सातशे या दरम्यान येते त्या ग्राहकाला १२ हजार ९८० रुपयांचे वीजबिल देत महावितरणने जणू विजेचा धक्का दिला आहे.
दरम्यान ग्राहकाने व त्यांच्या नातेवाईकांनी महावितरण कार्यालयाच्या अनेक वेळा पायऱ्या झिजवल्या मात्र बिल कमी करण्याबाबत दोन महिन्यात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर वीज मीटर टेस्ट करावा लागेल म्हणून ग्राहकडून टेस्ट फी भरणा करून घेतली. त्यालाही महिना उलटला मात्र मीटर टेस्ट करायला कोणी आलेच नाही. त्यामुळे ग्राहक हवालदिल झाले असून महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील भरड येथील दामले कुटुंबियांच्या भाड्याच्या खोलीत बी. जी. गिरकर हे सेवानिवृत्त शिक्षक अनेक वर्षे राहतात. वीज मिटर अरविंद दामले यांच्या नावावर आहे. सर्वसाधारण पाचशे ते सातशे या दरम्यान त्यांचे वीजबिल येते व ते भरणाही केले जाते. मात्र २३ एप्रिलला १२ हजार ९८० रुपये वीज बिल गिरकर यांच्या हाती पडले. अचानक एवढ्या रकमेचे बिल आल्याने त्यांनी महावितरण कार्यालयात विचारणा केली. मात्र साहेबांना भेटा, बिल भरावे लागेल अशीच उत्तरे देण्यात आली. त्यानंतर एका अधिकाऱ्याने मीटर टेस्ट करावा लागेल असे सांगितले. त्यासाठी १८ जूनला २६४ रुपये भरणा करून घेतले.
मात्र महिना उलटला तरी मीटर टेस्ट झाली नाही. अथवा महावितरण कार्यालयातून कोणतीही माहिती दिली नाही.
मात्र पुढील दोन महिने मे व जून यांचे वीज बिल पाचशे ते हजार या पटीत आहे. पण १२ हजार ९०० हे एप्रिल महिन्याचे बिल नव्या बिलात समाविष्ट होऊन येत आहे. त्यामुळे आता करायचे तरी काय ? या विवंचनेत ग्राहक आहेत. तरी महावितरणने तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी गिरकर यांचे जावई महेश मयेकर यांनी केली आहे.