तहसिलदारांचे आदेश : 15 दिवसात रक्कम भरण्याच्या सुचना
सावंतवाडी, ता. 23 ः येथील तपासणी नाक्याच्या परिसरात बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला 349 कोटी 70 लाख इतका दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतची माहिती तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. तशा प्रकारची नोटीस आज संबंधिताला बजावण्यात आली असून 15 दिवसात ही रक्कम भरण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले आहेत.
याबाबतची तक्रार बांद्यातील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी केली होती. बांदा तपासणी नाका परिसरात संबंधित ठेकेदार कंपनीकडून अनधिकृत उत्खनन करण्यात आले होते. त्या उत्खननाचा आकडा 2 लाख 13 हजार ब्रास एवढा होता. त्याच्यापलिकडे चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आल्याचा श्री. कल्याणकर यांचा आरोप होता. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कल्याणकर यांनी केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीनंतर संबंधित ठेकेदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावूनसुद्धा झालेल्या बेकायदा उत्खननाबाबत त्यांनी कोणताही लेखी खुलासा मुदतीत सादर केलेला नाही. तसेच उत्खननासाठी आवश्यक असलेली कोणतीही परवानगी तत्सम अधिकृत अधिकार्याकडून घेतलेली नाही. त्यामुळे आज याबाबतचे आदेश श्री. म्हात्रे यांनी दिले आहेत. 15 दिवसात ही रक्कम भरणा करावी असेही नोटीसीत म्हटले आहे. याबाबत ब्रेकिंग मालवणीनेही हा प्रश्न लावून धरला होता.